Islamabad Missile Threat : जागतिक राजकारणात मध्यस्थी करून आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला आता मोठा झटका बसला आहे. इस्लामाबाद येथे सुरू असलेली अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाची (Ceasefire) चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय थांबली आहे. या अपयशामुळे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स वॉशिंग्टनला रवाना झाले असून, पाकिस्तान आता दोन शक्तिशाली देशांच्या युद्धात भरडला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती, कारण या चर्चेचे अपयश पाकिस्तानसाठी केवळ कूटनीतिक हार नसून अस्तित्वाचे संकट ठरणार आहे.
दोन आघाड्यांवर पाकिस्तानची कोंडी
चर्चा फिसकटल्यानंतर पाकिस्तानसमोर आता मोठे सुरक्षा संकट उभे राहिले आहे. एका बाजूला अमेरिका आहे, ज्याच्यावर पाकिस्तान आर्थिक मदत आणि IMF कडून मिळणाऱ्या कर्जासाठी अवलंबून आहे. तर दुसरीकडे इराण हा थेट शेजारी देश असून, दोन्ही देशांमध्ये सुमारे 900 किलोमीटरची लांबीची सीमा आहे. सध्या ही अत्यंत संवेदनशील बनलेली आहे. जर या भागात लष्करी संघर्ष पेटला, तर आधीच खिळखिळी झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था अनेक दशके मागे ढकलली जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सौदी अरेबियाच्या संरक्षणार्थ सैन्य रवाना
या संपूर्ण वादात पाकिस्तानने शनिवारी घेतलेल्या एका निर्णयाने इराणच्या संतापात भर घातली आहे. 2025 मध्ये झालेल्या सुरक्षा करारानुसार, पाकिस्तानने आपले फायटर जेट्स आणि लष्करी तुकड्या सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी पाठवल्या आहेत. सौदी अरेबिया हा अमेरिकेचा जवळचा मित्र असल्याने आणि इराणशी त्याचे संबंध तणावपूर्ण असल्याने, पाकिस्तान आता अप्रत्यक्षपणे इराणविरोधी गटात सामील झाल्याचे मानले जात आहे. यामुळे पाकिस्तानची सैन्य संसाधने आता विविध मोर्च्यांवर विभागली गेली आहेत.
हेही वाचा – US Iran War: 'या' दोन अटींवरून अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; मध्यस्थ पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर
हवाई तळांच्या मागणीवरून संघर्षाची ठिणगी
अमेरिका आता इराणविरुद्ध लष्करी पर्यायांचा विचार करत असून, यासाठी ते पाकिस्तानकडे बलुचिस्तानजवळील हवाई तळांची (Airbases) मागणी करू शकतात. इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ले करण्यासाठी हे तळ धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. याआधी अमेरिकेने इराणच्या आसपासच्या देशांमधील लष्करी तळांचा वापर केला होता. त्यावर इराणने त्या देशांमध्ये मिसाईल्स, ड्रोन्स यांचा वापर करून त्या तळांचे मोठे नुकसान केले होते. त्याच पद्धतीने आता जर पाकिस्तानने अमेरिकेला आपली भूमी वापरू दिली, तर इराणकडून थेट इस्लामाबाद किंवा इतर महत्त्वाच्या शहरांवर मिसाईल्स आणि ड्रोन्सचा मारा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणने यापूर्वीच अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे.
इस्लामाबादवर हल्ल्याची टांगती तलवार
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानला आपल्या सीमांचे रक्षण करण्यासोबतच सौदी अरेबियाला दिलेले वचन पाळावे लागणार आहे. जर अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवरून इराणवर हल्ला केला, तर पाकिस्तान थेट प्रादेशिक युद्धात ओढला जाईल. यामुळे पाकिस्तानच्या नागरी पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण झाला असून, इस्लामाबादवर मिसाईल्स कोसळणार का, या भीतीने संपूर्ण देश दहशतीखाली आहे. जागतिक व्यासपीठावर मध्यस्थ बनू पाहणारा देश आता स्वतःच विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र दिसत आहे.