Middle East Crisis: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असताना, भारतावर याचा काय परिणाम होणार याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आला असला तरी भारताने परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे.
'कच्च्या तेलाचा साठा पुरेसा; पुरवठा विस्कळीत होणार नाही'
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असले तरी, भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा निर्वाळा सुजाता शर्मा यांनी दिला आहे. देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरीज) पूर्ण क्षमतेने आणि कार्यक्षमतेने सुरू आहेत. सामान्य ग्राहकांना इंधनाचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळत राहील, याची खात्री सरकारने दिली आहे. नागरिकांनी आर्थिक बोजा कमी करण्यासाठी 'कारपूलिंग' आणि मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढवण्यावर भर द्यावा, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
LPG वितरणाचे विक्रमी आकडे; तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या
इंधन आणि गॅसच्या तुटवड्याबाबतच्या अफवांना पूर्णविराम देत सुजाता शर्मा यांनी सांगितले की, कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रावर इंधनाचा तुटवडा नाही. विशेषतः घरगुती LPG चा पुरवठा अखंडितपणे सुरू आहे. आकडेवारी सादर करताना त्यांनी नमूद केले की, गेल्या 3 दिवसांत 11.4 दशलक्ष (1.14 कोटी) बुकिंग्सच्या तुलनेत 12.6 दशलक्ष (1.26 कोटी) सिलिंडर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.
हेही वाचा – US Dollar vs Rupee: रुपयाची ऐतिहासिक घसरण! पहिल्यांदाच 95 ची पातळी पार; पेट्रोल-डिझेलसह महागणार 'या' वस्तू
व्यावसायिक आणि ऑटो LPG विक्रीत वाढ
घरगुती वापरासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. गेल्या 3 दिवसांत व्यावसायिक LPG ची विक्री 17,000 टनांहून अधिक झाली आहे, तर 'ऑटो LPG' ची विक्री 762 टनांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. जागतिक संकट असले तरी भारताची ऊर्जा सुरक्षा भक्कम असून नागरिकांनी घाबरून न जाता ऊर्जेची बचत करावी, असे आवाहन सरकारने केले आहे.