Gopichand Padalkar: भाजपचे आक्रमक नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 'मी गेल्या 10 वर्षांपासून पवारांच्या विरोधात आहे, त्यांनी माझे काहीही वाकडे केले नाही; मग ते महेश लांडगेंचे काय वाकडे करणार?' असा थेट सवाल त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका जाहीर सभेत विचारला.
भाजपच्या नादी लागाल तर… पडळकरांचा गंभीर इशारा
आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरलेल्या पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजपच्या नादी लागलात, तर भर चौकात उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उल्लेख त्यांनी 'सोन्याचे अंडे देणारी कोंबडी' असा केला. विरोधकांना केवळ ही कोंबडी कापण्यात रस आहे, म्हणूनच ते वारंवार लांडगेंवर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पवारांच्या संपत्तीवरून बोचरी टीका
अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर भाष्य करताना पडळकर यांची तोफ चांगलीच धडाडली. ते म्हणाले, अजित पवारांची छाती फाडली, तर त्यातून त्यांनी ढापलेले 10-15 साखर कारखाने बाहेर येतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक सातबारे अजित पवारांच्याच नावावर निघतील, असा गंभीर दावा त्यांनी केला. महेश लांडगे हे मातीतले नेते आहेत, ते रोहित पवारांसारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
2029 पर्यंत राष्ट्रवादी टिकेल की नाही शंकाच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडळकर म्हणाले की, या पक्षाची 'एक्सपायरी डेट' जवळ आली आहे. 2029 पर्यंत हा पक्ष शिल्लक राहील की नाही, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळाली आहे, ती नीट सांभाळा, उगाच भाजपच्या नादी लागू नका, असा दमही त्यांनी यावेळी दिला.
महेश लांडगे म्हणजे वाघ – पडळकर
महेश लांडगे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, लांडगे हे जनतेतून तयार झालेले 'पैलवान' नेते आहेत. त्यांनी नऊ वर्षांत केलेला विकास हा विरोधकांच्या 40 वर्षांच्या कामावर भारी आहे. महेश लांडगे वाघ आहेत, त्यांनी पंजा मारला तर तुमचा कार्यक्रम होईल,' असा इशारा देऊन त्यांनी विरोधकांना शांत राहण्याचा सल्ला दिला.