Ganesh Naik : राजकीय पटलावर मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी थेट बंडखोरी करत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन नव्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली होती, ज्याला लोकसभा अध्यक्षांनी हिरवा कंदील दिला आहे. यानंतर या सर्व खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, या विस्तारात शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, पक्षांतर केलेल्या या ६ खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या दोन नेत्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
क्लस्टर योजनेवरून गणेश नाईक आक्रमक; नगरविकास धोरणावर केली कडक टीका
एकीकडे शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होत असताना, दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे वनमंत्री आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. नवी मुंबईतील ३० वर्षे जुन्या न झालेल्या, भक्कम असलेल्या आणि अतिधोकादायक नसलेल्या इमारतींनाही बळजबरीने या योजनेत समाविष्ट करून क्लस्टर डेव्हलपमेंटचे अनावश्यक फॅड पसरवले जात असल्याचा गंभीर आरोप नाईकांनी केला आहे. तसेच युडीसीपीआर (UDCPR) नियमावली आणणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या धोरणामुळे एफएसआय वाढला तर नवी मुंबईतील नागरिकांचे राहणीमान आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Dhananjay Mundhe: ‘शारीरिकच नाही, राजकीय वजनही कमी झालं’; धनंजय मुंडेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत
“माझ्या नादाला लागू नका”; शिंदेंचे नाव न घेता थेट इशारा
नवी मुंबईच्या नगरविकास धोरणावरून संतापलेल्या गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत आपली भूमिका मांडताना थेट थेट आक्रमक पवित्रा घेतला. नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत नाईक म्हणाले की, “गणेश नाईकच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केल्यास त्याला त्याची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.” त्यांच्या या रोखठोक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा इशारा थेट एकनाथ शिंदे यांनाच असल्याचे स्पष्ट दिसत असून, आता या थेट आव्हानावर शिंदे काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.