Sanjay Raut On Eknath Shinde: ठाण्यातील मनसे उमेदवाराच्या कथित अपहरणावरून राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'एकनाथ शिंदेंमध्ये जर खरी हिंमत असेल, तर त्यांनी पोलिसांचा वापर करून उमेदवार पळवण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात समोरून लढावे. त्यांनी पाठीमागून खंजीर खुपण्याचे उद्योग थांबवावेत,' अशा खोचक शब्दांत राऊतांनी त्यांना आव्हान दिलं आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
मनसे नेते अविनाश जाधव यांनी समोर आणलेल्या व्हिडिओचा दाखला देत राऊत म्हणाले की, लोकशाहीचा गळा आवळला जात आहे. पोलीस उमेदवारांच्या घरात घुसून त्यांना थेट उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन जातात, हे संतापजनक आहे. पोलिसांवर नक्कीच वरून दबाव आहे. निवडणूक आयोग यावर काहीही करणार नाही, ते केवळ कागदी घोडे नाचवतील. आता या अन्यायाविरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मशाल आणि इंजिनची सत्ताधाऱ्यांना धास्ती
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर टीका करताना म्हटले की, आमचा पक्ष आणि चिन्ह चोरूनही तुमचे समाधान झालेले नाही. आता तुम्हाला 'मशाल' आणि 'इंजिन'ची इतकी भीती वाटत आहे की, विरोधकांनी निवडणूकच लढवू नये यासाठी तुम्ही उमेदवार पळवत आहात. 10-15 हजार रुपये वाटून किंवा दहशतीने मुंबई-ठाण्याचे मतदार बदलतील, हा तुमचा भ्रम आहे. जनतेच्या मनातील चीड मतपेटीतून नक्कीच बाहेर पडेल.
बाळासाहेबांच्या पुतळ्याची भीती का?
निवडणूक आयोगाने मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याच्या कारवाईचाही राऊतांनी तीव्र निषेध केला. आयोगाचा हा निर्णय मूर्खपणाचा आहे. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत. जर त्यांचा पुतळा झाकला जातो, तर अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे उघडे का? खरं तर शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात बाळासाहेबांच्या नावाची दहशत आहे. पण पुतळा झाकून लोकांच्या मनातील विचार तुम्ही पुसू शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.