Geetanjli Wangchuk : राजधानी दिल्लीत 'नीट यूजी' परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) नेते अभिजित दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांच्या नेतृत्वाखाली जुलै 20 रोजी जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने महामोर्चा काढण्यात आला. देशभरातून आलेल्या हजारो तरुणांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलक थेट संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये मोठी चकमक उडाली.
जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी आणि पांगवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अश्रूधुराचा वापर केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असून, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.
जबाबदारी न सांभाळणाऱ्यांचा राजीनामा घ्या: गीतांजली वांगचुक
दरम्यान, या विषयावरून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध विचारवंत सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचूक यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली आहे. "आम्ही कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर देशाच्या आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत. जर भारताची शिक्षण व्यवस्था जगात सर्वोत्तम करायची असेल, तर ज्यांना आपली जबाबदारी पेलता आली नाही त्यांच्या राजीनाम्यापासूनच याची सुरुवात झाली पाहिजे," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणाच्या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
प्रशासनाच्या कारभारावर अविश्वास; इंटरनेट सेवा ठप्प केल्याने संताप
दिल्लीतील वाढत्या तणावामुळे प्रशासनाने अनेक भागांतील दरम्यान, इंटरनेट सेवा बंद केली आहे. या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत गीतांजली वांगचूक म्हणाल्या की, "इंटरनेटवर बंदी घालून हे सरकार देशाला 'विश्वगुरू' बनवू शकत नाही. माझा सध्याच्या सरकारी यंत्रणेवर कोणताही विश्वास उरलेला नाही." सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, त्यांना सध्याच्या रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.