Nilesh Rane on Thackeray Brothers : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गट शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ठाकरे बंधू पुन्हा सत्तेत आले तर ते केवळ लुटमार करतील आणि मुंबईला किमान 25 वर्षे मागे ढकलतील,’ असा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला आहे.
मुंबईच्या विकासाचा रोडमॅप महत्त्वाचा
निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे यांनी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही केवळ घोषणाबाजी करणारे लोक नसून जाहीरनामा तंतोतंत फॉलो करणारे लोक आहोत. मुंबईला सध्या अधिक रिंगरोडची गरज आहे आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. हे सर्व मूलभूत प्रश्न सोडवण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच जनतेने निवडून दिले पाहिजे.
अडीच वर्षांच्या कार्यकाळावर टीका
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करत राणे यांनी ठाकरेंवर टीका केली. ‘जेव्हा अडीच वर्षे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते, तेव्हा हे केवळ आपापसात भांडत बसले. विकासापेक्षा वैयक्तिक वादाला त्यांनी महत्त्व दिले. आम्ही आता मुंबईसाठी एक सक्षम ‘रोडमॅप’ तयार करणार आहोत. लोकांना नेमके काय पाहिजे, हे ओळखून प्रकल्प राबवणे आवश्यक आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – Raj Thackeray : ‘इतका चुकीचा कॅरम फुटलाय की…’, राज ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
प्रकल्पांचे नियोजन आणि तांत्रिक सुधारणा
कोस्टल रोडसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी मान्य केले की, यात काही तांत्रिक अडचणी आल्या आहे. मात्र, योग्य नियोजन करून या अडचणी दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूंनी केवळ मराठी माणसांचा वापर केला असून सत्तेत आल्यावर ते मुंबईचे नुकसानच करतील, असा दावाही त्यांनी केला.