Israel-Iran Conflict: गेल्या 15 दिवसांपासून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाने आता टोकाचे वळण घेतले आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारण्याची उघड धमकी दिली आहे. "जर हा मुलांचा मारेकरी गुन्हेगार जिवंत असेल, तर आम्ही त्याचा पूर्ण ताकदीनिशी शोध घेऊ आणि त्याला संपवू," अशा शब्दांत IRGC ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही धमकी त्यांच्या 'सेपाह न्यूज' या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेसह अमेरिकेपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेतान्याहूंच्या अस्तित्वाबाबत संभ्रम आणि सोशल मीडियावरील दावे
सध्या सोशल मीडिया आणि विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये नेतान्याहू यांच्या स्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून नेतान्याहू सार्वजनिकरीत्या दिसलेले नसल्यामुळे, इराणने त्यांना संपवल्याचा दावा काही पोस्ट्समध्ये केला जात आहे. मात्र, या संदर्भात इस्रायल किंवा अमेरिकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. खुद्द इराणमध्येही या विषयावर अनिश्चितता असून, IRGC च्या विधानावरून हे स्पष्ट होते की, नेतान्याहू जिवंत आहेत की मृत, याबाबत त्यांनाही अद्याप खात्री नाही. तरीही, ते जिवंत असल्यास त्यांचा पाठलाग करून जीव घेण्याची शपथ इराणी रक्षकांनी घेतली आहे.
युद्धाची पार्श्वभूमी: अयातुल्ला खामेनींच्या हत्येचा बदला
इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका मोठ्या घटनेनंतर पेटला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने राबवलेल्या एका संयुक्त गुप्त मोहिमेत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना संपवण्यात आलं होतं. या घटनेचा बदला घेण्यासाठी इराणने आता पूर्ण ताकदीनिशी युद्ध पुकारले आहे. अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र आणि नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूला बेंजामिन नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे. याच सूड भावनेतून इराणने मध्यपूर्वेतील इस्रायली आणि अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे व ड्रोनद्वारे हल्ले सत्र सुरू केले असून संपूर्ण प्रदेश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.