Amit Deshmukh: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनाला दीड महिना उलटूनही अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत, “राज्याचे उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील, तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
अमित देशमुखांचे सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह
अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना अमित देशमुख यांनी सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर बोट ठेवले. ते म्हणाले की, या दुर्घटनेवर गृह विभाग किंवा शिष्टाचार विभागाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण का दिले नाही? बारामती विमानतळाचे संचलन करणाऱ्या MIDC आणि MADC सारख्या संस्था या विषयावर मौन का बाळगून आहेत, असा सवाल त्यांनी केला. VVIP सुरक्षेसाठी निश्चित नियमावली असतानाही हा अपघात घडलाच कसा, याचे सविस्तर निवेदन सरकारने सभागृहात सादर करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
शशिकांत शिंदे यांचा ‘स्थगन प्रस्ताव’ फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे. शिंदे यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. “पाच दिवस उलटूनही सभागृहात यावर चर्चा होऊ दिली जात नाही. विधानसभा असो वा लोकसभा, अजित दादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर येण्यापासून रोखले जात आहे का?” असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्य जनतेसमोर आणण्यासाठी सरकारने चर्चा टाळू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
श्री.अमित देशमुख जी यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच या विषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे .@AmitV_Deshmukh… https://t.co/52aUsk2hnC — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2026
रोहित पवारांचा सीबीआय तपासासाठी पाठपुरावा
दुसरीकडे, आमदार रोहित पवार हे या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यासाठी दिल्लीत सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमित देशमुख यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरल्याबद्दल रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले. “सरकारने केवळ तांत्रिक उत्तरे न देता या अधिवेशनात ठोस भूमिका मांडावी,” अशी अपेक्षा त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनाचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी कुटुंबासह राजकीय वर्तुळातूनही दबाब वाढत आहे.