Ashok Chavan: बारामती विधासभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीबाबत माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. “बारामतीची निवडणूक जर बिनविरोध झाली, तर त्यातून समाजात एक अतिशय चांगला आणि वेगळा संदेश जाईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जपायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचे आवाहन
अशोक चव्हाण यांच्या मते, महाराष्ट्राला वैचारिक आणि सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आहे. ही प्रथा आणि संस्कृती जपली पाहिजे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. जर सर्वच राजकीय पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध केली, तर ते राज्याच्या राजकीय इतिहासात एक आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कामाच्या जोरावर विजयाचा विश्वास
यावेळी बोलताना चव्हाण यांनी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचेही कौतुक केले. त्यांनी केलेल्या विकासकामांची व्याप्ती आणि जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम पाहता, ही निवडणूक त्यांच्या कुटुंबासाठी पूर्णपणे अनुकूल असेल, असा दावा चव्हाणांनी केला आहे. लोकांचा पाठिंबा आणि केलेल्या कामाची पावती म्हणून ही निवडणूक बिनविरोध होणे शक्य असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अशोक चव्हाण यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ‘बिनविरोध’ निवडीचा हा प्रस्ताव इतर राजकीय पक्ष गांभीर्याने घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, चव्हाणांच्या या भूमिकेमुळे बारामतीच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.