Abhijeet Dipke: ‘मी मुस्लिम असतो तर आतापर्यंत…’; अभिजीत दिपकेंच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ

जंतरमंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनादरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील राजकीय वातावरण तापले आहे.

Abhijeet Dipke: ‘मी मुस्लिम असतो तर आतापर्यंत…’; अभिजीत दिपकेंच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनादरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील राजकीय वातावरण तापले आहे. "मी जर उमर खालिद किंवा इतर कोणताही मुस्लिम असतो, तर आतापर्यंत तुरुंगात सडत असतो, याची मला पूर्ण जाणीव आहे," असे विधान दिपके यांनी जंतरमंतरवरील एका मुलाखतीत केले. दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपांमुळे गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात असलेले उमर खालिद (ज्यांना सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे) यांच्या संदर्भाने हे विधान केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून रणकंदन; सोनम वांगचुक यांचाही पाठिंबा
NEET पेपरफुटी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधील (NTA) सावळागोळ आणि SSC परीक्षांमधील अनियमितता यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी अभिजीत दिपके थेट अमेरिकेतून भारतात परतले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला देशातील तरुण आणि विरोधी पक्षांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला असून, तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी जंतरमंतरवर उपोषण सुरू केले आहे. तसेच, पेपरफुटीच्या नैराश्यातून जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही या न्याय्य लढ्यात सहभागी झाले आहेत.

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना न्यायासाठी याचना करावी लागतेय
दिपके यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट पीडित कुटुंबांच्या व्यथा मांडत सरकारच्या उदासीनतेवर तीव्र शब्दांत प्रहार केला. दीप मेघवाल, आकांक्षा चतुर्वेदी, अमायरा कुमार आणि कहान पटेल यांसारख्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. "आज या बाधित कुटुंबांवर न्यायासाठी दारोदार भटकण्याची आणि याचना करण्याची वेळ आली आहे. परंतु, सरकारच्या एकाही प्रतिनिधीला या मुलांच्या मृत्यूबाबत साधी संवेदना व्यक्त करावीशी वाटली नाही किंवा त्यांनी या कुटुंबांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही," असा गंभीर आरोप दिपके यांनी केला.

हेही वाचा – Aishwarya Rai Song: शिक्षण मंडळाचे चाललेय काय? पाचवीच्या पाठ्यपुस्तकात ऐश्वर्या रायचे गाणे छापल्याने मोठा गदारोळ

सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर दिपकेंचा थेट वार
सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अभिजीत दिपके यांनी सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. "सत्ताधारी नेमके इतके निर्दयी आणि अहंकारी कसे असू शकतात? ज्यांनी आपली तरुण मुले गमावली, त्यांच्या सांत्वनासाठी जाण्याची गरजही सरकारला वाटत नाही, हे दुर्दैवी आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुम्ही कोणाची गेलेली मुले परत आणू शकत नाही, हे मान्य आहे. पण किमान त्या पीडित पालकांना भेटून, त्यांची माफी मागून दुःख हलके करण्याचे सौजन्य तरी दाखवायला हवे. देशाच्या नागरिकांनी सरकारकडून एवढी माफक अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे का?" असा रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number