Neelam Gorhe: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘अशोक खरात’ प्रकरणात आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “मी गेली 4 दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. कोणत्याही पदासाठी किंवा मंत्रिपदासाठी भोंदूबाबांचे उंबरठे झिजवण्याची मला गरज नाही.” अधिवेशनाच्या निरोपाच्या भाषणात केलेल्या टीकेमुळे काही मंडळी दुखावली गेली असून, त्या ‘पोटदुखी’तूनच आपल्यावर चिखलफेक केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राजकीय षडयंत्राचा आरोप आणि स्पष्टीकरण
डॉ. गोऱ्हे यांनी थेट नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे ज्यांना त्रास झाला आहे, त्यांनीच हे षडयंत्र रचल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या संस्कारांविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “माझ्या कुटुंबाने दिलेल्या संस्कारांनुसार मी कधीही हयात असलेल्या कोणत्याही ‘बाबा’च्या दर्शनाला जात नाही. त्यामुळे अशोक खरातला जाणीवपूर्वक भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” नाशिकमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा दावाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : ‘…तर LPG बंद होऊ शकतो’, इंधन तुडवड्याच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं धक्कादायक वक्तव्य
पुराव्यांचे आव्हान आणि SIT तपासाचे स्वागत
सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक लोक फोटो काढायला येतात, मात्र कोणत्याही महाराजाकडे आपण कधीच गेलो नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना पुराव्यानिशी आरोप करण्याचे आव्हान दिले आहे. “केवळ हवेत गोळीबार करून चारित्र्यहनन करू नये,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सध्या या प्रकरणाचा तपास सरकारमार्फत SIT कडे सोपवण्यात आला आहे. या तपासाचे स्वागत करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, तपास प्रक्रिया सुरू असल्यामुळे अधिक बोलणे योग्य नाही, मात्र यातून लवकरच ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल.