Deepak Kesarkar: ‘कॅप्टन खरात प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही…’; दीपक केसरकरांचे विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर

विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना केसरकर म्हणाले की, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध जोडणे हा निव्वळ राजकीय द्वेष आहे.

Deepak Kesarkar: ‘कॅप्टन खरात प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही…’; दीपक केसरकरांचे विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर

Deepak Kesarkar: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॅप्टन खरात (Captain Kharat) प्रकरणावरून माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना केसरकर म्हणाले की, “या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध जोडणे हा निव्वळ राजकीय द्वेष आहे. कॅप्टन खरात यांनी केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद असून, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही माझीही भावना आहे.”

ईशानेश्वर मंदिराच्या निमित्ताने झाली होती ओळख
दीपक केसरकर यांनी खरात यांच्यासोबतच्या फोटोंवर खुलासा करताना सांगितले की, “मी वयाच्या 15 व्या वर्षांपासून शिवभक्त आहे आणि गेल्या 55 वर्षांपासून दर सोमवारी न चुकता शिवमंदिराला भेट देतो. याच निमित्ताने सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराला भेट दिली असता माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झाली होती. सोशल मीडियावर जे फोटो फिरत आहेत, त्यातील एक फोटो हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ईशानेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीची पूजा करतानाचा आहे, ज्यामध्ये मी उपस्थित आहे. तर दुसरा फोटो हा मंदिराच्या ऑफिसमधील आहे.”

कार्यक्रमातील उपस्थिती आणि व्हायरल फोटोचे सत्य
केसरकर यांनी स्पष्ट केले की, तिसरा जो फोटो दाखवला जात आहे, तो सिन्नर येथील एका सहकारी संस्थेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमातील आहे. त्या कार्यक्रमाला मला पाहुणे म्हणून बोलावले होते आणि तिथे कॅप्टन खरात यांच्यासह महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. “एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मंदिराचे ट्रस्टी म्हणून कोणासोबत फोटो असणे याचा अर्थ त्यांच्या गुन्ह्यात सहभागी असणे असा होत नाही. मी कधीही कोणत्याही पोलीस स्टेशनला त्यांना वाचवण्यासाठी फोन केलेला नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

संजय राऊत आणि ‘उबाठा’ गटावर घणाघाती टीका
हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून विशेषतः ‘उबाठा’ गटाचे नेते संजय राऊत यामध्ये आघाडीवर असल्याचे केसरकर म्हणाले. “ज्यावेळी शिवसेनेमध्ये संघर्ष झाला, त्यावेळी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. मात्र, मुख्य प्रवक्ते म्हणून मी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बाजू मांडली, त्यामुळे त्यांचा कट यशस्वी होऊ शकला नाही. त्याच रागापोटी संजय राऊत आणि त्यांचे सहकारी माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत,” असा आरोप केसरकर यांनी केला.

हेही वाचा – Rupali Thombare: ‘चाकणकरांचे कृत्य वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही…’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया

जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी पत्रकार परिषद
केसरकर यांनी स्पष्ट केले की, ते गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर असल्याने या विषयावर बोलू शकले नव्हते. मात्र, जनतेच्या मनात कोणताही संशय राहू नये, यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. “मी निर्विवादपणे सांगतो की, या प्रकरणात माझा काडीमात्र संबंध नाही. महिलांच्या संदर्भात असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा दिलीच पाहिजे,” असे म्हणत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number