Sanjay Gaikwad: आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड एका खळबळजनक विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. “मी कार्यकर्त्यांसाठी तब्बल 35 कोटी रुपयांचे कमिशन सोडून दिले,” असे धक्कादायक विधान त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले. आमदारांनी थेट ‘कमिशन’ शब्दाचा उल्लेख केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, भ्रष्टाचाराच्या जाहीर कबुलीवरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
“काम म्हणायचं होतं, पण तोंडातून कमिशन आलं”
हे विधान अंगलट येत असल्याचे लक्षात येताच संजय गायकवाड यांनी तातडीने यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. “मला 35 कोटींची ‘कामे’ कार्यकर्त्यांना वाटली असे म्हणायचे होते, परंतु चुकून माझ्या तोंडातून ‘कमिशन’ हा शब्द बाहेर पडला,” असा दावा त्यांनी केला. प्रकृतीच्या कारणास्तव बोलताना थोडी अडचण येत असल्याने हा शब्द तोंडात आल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधकांना टोला आणि तांत्रिक अडचण
या वादावर बोलताना गायकवाड पुढे म्हणाले की, “आम्हाला वर्षाला पाच कोटींचा निधी मिळतो, अशा परिस्थितीत 35 कोटींचे कमिशन मिळणे तांत्रिकदृष्ट्या शक्यच नाही. विरोधकांनी या विधानाचा बाऊ करू नये, तो केवळ बोलण्याच्या ओघात झालेला बदल आहे.” मात्र, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आमदाराने असे विधान केल्याने विरोधक आता आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.