Salary Overdraft : महिन्याचा शेवट जवळ आला की अनेकांच्या खिशाला कात्री लागते. अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर घरगुती खर्चासाठी पैसे कमी पडल्यास आपण गोंधळून जातो. मात्र, जर तुमचे बँक खाते रिकामे असेल किंवा त्यात 'झिरो बॅलन्स' असेल, तरीही तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता. ही जादू नसून बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची सुविधा आहे, जिला 'सॅलरी ओव्हरड्राफ्ट' (Salary Overdraft) असे म्हटले जाते. पैशांचे नियोजन करणे ही एक कला आहे आणि ज्यांना ती अवगत नसते, त्यांच्यासाठी ही सुविधा संकटकाळात वरदान ठरू शकते.
काय आहे 'सॅलरी ओव्हरड्राफ्ट' सुविधा?
ओव्हरड्राफ्ट (OD) हा एक प्रकारचा अल्पमुदतीचा कर्ज प्रकार आहे, जो बँका त्यांच्या सॅलरी अकाउंट होल्डर्सना देतात. तुमच्या खात्यात पैसे नसतानाही तुम्ही ठराविक मर्यादेपर्यंत रक्कम काढू शकता. अनेक बँका पगारदार व्यक्तीला त्यांच्या पगाराच्या 2 ते 3 पट रक्कम ओव्हरड्राफ्ट म्हणून देतात. उदाहरणार्थ, HDFC बँक ग्राहकाच्या पगाराच्या 3 पट किंवा 25,000 रुपयांपासून ते 1,25,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. काही बँकांमध्ये ही मर्यादा पगाराच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असू शकते.
वैयक्तिक कर्जापेक्षा वेगळे आणि फायदेशीर
सॅलरी ओव्हरड्राफ्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला दरमहा 'ईएमआय' (EMI) भरण्याचे टेन्शन नसते. वैयक्तिक कर्जात (Personal Loan) तुम्हाला दरमहा हप्ते भरावे लागतात, मात्र ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्ही घेतलेली रक्कम सोयीनुसार ठराविक काळात परत करू शकता. या सुविधेवर तुम्हाला केवळ वापरलेल्या रकमेवर आणि कालावधीवरच व्याज (Interest) द्यावे लागते. हे संकटकाळात मिळणारे एक सोयीस्कर 'शॉर्ट-टर्म लोन' मानले जाते.
हेही वाचा – 1 एप्रिलपासून आयकर नियमांत मोठी उलथापालथ! मील कार्ड, पॅन ते आयटीआरमध्ये होणार मोठे बदल
रक्कम वेळेवर न परत केल्यास होणारे परिणाम
जरी ओव्हरड्राफ्टमध्ये EMI नसला तरी, घेतलेली रक्कम वेळेवर परत करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ओव्हरड्राफ्टची रक्कम वेळेत भरली नाही, तर तुमच्या पुढील महिन्याचा पगार जमा होताच बँक ती रक्कम आपोआप कापून घेते. सतत देयके प्रलंबित राहिल्यास बँक तुमचे खाते बंद करू शकते. तसेच, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) खराब होतो, ज्यामुळे भविष्यात मोठे कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. थकीत रक्कम वसुलीसाठी बँक कायदेशीर मार्गाचाही अवलंब करू शकते.
सुविधेचा लाभ घेताना घ्यायची खबरदारी
ही सुविधा वापरण्यापूर्वी आपल्या बँकेचे नियम नीट समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक बँकेचे ओव्हरड्राफ्टचे नियम आणि व्याजाचे दर वेगवेगळे असतात. ही सुविधा केवळ आपत्कालीन स्थितीसाठीच वापरणे शहाणपणाचे ठरते, कारण यावर आकारले जाणारे व्याज हे बचत खात्यावरील व्याजापेक्षा जास्त असते. महिन्याच्या शेवटी आर्थिक चणचण भासू नये म्हणून पगाराचे योग्य व्यवस्थापन करणे हाच उत्तम मार्ग आहे. मात्र, असे नियोजन केलेले असतानाही पैशांची अडचण आल्यास 'ओव्हरड्राफ्ट' हा एक मजबूत आर्थिक आधार म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असतो.