Nagarparishad Election Result: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांनुसार भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष ठरला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
राज्यातील राजकीय पक्षांचे अंतिम बलाबल
महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार, भारतीय जनता पक्षाने राज्यात एकहाती वर्चस्व गाजवत नगराध्यक्ष पदाची दिमाखदार 'सेंच्युरी' पूर्ण केली आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 129 नगराध्यक्ष निवडून आणले असून, त्यांचे तब्बल 3325 सदस्य विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत 51 नगराध्यक्ष आणि 695 सदस्यांसह आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 35 नगराध्यक्ष आणि 311 सदस्यांसह आपले स्थान टिकवून ठेवले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाही 35 नगराध्यक्ष पदांवर यश मिळाले असून त्यांचे 131 सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा फटका बसल्याचे चित्र असून, शिवसेना (ठाकरे गट) केवळ 9 नगराध्यक्ष आणि 378 सदस्यांवर मर्यादित राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला केवळ 7 नगराध्यक्ष आणि 153 सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय, इतर पक्ष आणि अपक्षांनी 22 नगराध्यक्ष पदे पटकावली असून त्यांचे 140 सदस्य निवडून आले आहेत.
विभागनिहाय निकालांचा कल, कुठे कोण ठरले सरस?
विदर्भ (एकूण 100 जागा):
विदर्भात भाजपने 58 जागांसह एकहाती वर्चस्व मिळवले आहे. काँग्रेसला येथे 23 जागा मिळाल्या, तर ठाकरे आणि शरद पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही.
मराठवाडा (एकूण 52 जागा):
मराठवाड्यात भाजपने 25 नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. शिंदे गटाला 8 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटाला येथे केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.
उत्तर महाराष्ट्र (एकूण 49 जागा):
चुरशीची लढत उत्तर महाराष्ट्रात भाजपने 18 जागा जिंकल्या आहेत, तर शिंदे गटाने 11 जागांसह जोरदार मुसंडी मारली आहे.
पश्चिम महाराष्ट्र (एकूण 60 जागा):
पश्चिम महाराष्ट्रात भाजप (19), शिंदे गट (14) आणि अजित पवार गट (14) यांच्यात समसमान ताकद विभागली गेली आहे.
कोकण (एकूण 27 जागा):
कोकणात भाजपने 9 जागा जिंकल्या असल्या तरी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 10 जागा मिळवत भाजपला मागे टाकले आहे.
गेल्यावेळेपेक्षा भाजपची ताकद वाढली
मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने आपली कामगिरी सुधारली आहे. मागील वेळी भाजपचे 94 नगराध्यक्ष होते, जो आकडा आता थेट 129 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, काँग्रेसची संख्या 51 वरून 35 वर घसरली आहे.