Assam CM Oath Ceremony: आसाम विधानसभा निवडणुकीत NDA च्या दणदणीत विजयानंतर, हिमंत बिस्वा सरमा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. या ऐतिहासिक शपथविधीसह, आसाममध्ये सलग दोन कार्यकाळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आहेत. गुवाहाटी येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
या 4 मंत्र्यांनीही घेतली शपथ; मंत्रिमंडळाचा विस्तार
मुख्यमंत्री सरमा यांच्यासोबतच इतर 4 महत्त्वाच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये प्रशासकीय अनुभव आणि प्रादेशिक समीकरणांचा मेळ घालण्यात आला आहे:
रामेश्वर तेली: भाजप नेते आणि मोदी सरकारमधील माजी राज्यमंत्री.
अजंता नेओग: मागील सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेल्या अनुभवी नेत्या.
अतुल बोरा: आसाम गण परिषदेचे अध्यक्ष आणि मागील दोन सरकारांमध्ये मंत्री राहिलेले नेते.
चंदन बोरो: चंदन बोरो हे बोडोलँड पीपल्स फ्रंटचे नेते असून त्यांनी मागील सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले होते.
NDA सरकारचा सलग तिसरा कार्यकाळ
आसाममध्ये NDA सरकारचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे. 2016 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या नेतृत्वाखाली सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री बनले होते, तर 2021 मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. या शपथविधी सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
#WATCH गुवाहाटी: भाजपा के हिमंत बिस्वा सरमा ने खानापारा के वेटरनरी कॉलेज मैदान में लगातार दूसरी बार असम के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली। pic.twitter.com/8mXa5VlRmX — ANI_HindiNews (@AHindinews) May 12, 2026
हिमंत बिस्वा सरमा: रणनीतीकार ते मुख्यमंत्री
सरमा यांनी 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपचे केवळ 5 आमदार असताना त्यांनी ईशान्य भारतात पक्षाला बळकट करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. 2016 मध्ये त्यांची ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ (NEDA) चे संयोजक म्हणून नियुक्ती झाली. ईशान्येतील प्रादेशिक पक्षांना भाजपच्या आघाडीत सामील करून घेण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या राजकीय रणनीतीमुळेच आज ईशान्य भारतात भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे.
विद्यार्थी राजकारणातून सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत
सरमा यांचे शिक्षण गुवाहाटी येथे झाले असून त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण आणि LLB पूर्ण केले आहे. 2006 मध्ये त्यांना PhD प्रदान करण्यात आली. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली. 1991-92 मध्ये त्यांनी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. 2001 मध्ये ते ‘जालुकबारी’ मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार (MLA) म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून त्यांनी या मतदारसंघात आपली पकड कायम राखली आहे.