Boat Sinking: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. मच्छिमारी उरकून बंदराच्या दिशेने परतत असताना 'अलमका' नावाची पर्ससीन नौका भर समुद्रात बुडाली. या बोटीवर असलेल्या 15 ते 20 खलाशांना मृत्यूने समोरून गाठले होते, मात्र स्थानिक मच्छिमारांच्या धाडसामुळे सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
वादळी वारा अन् उंच लाटांनी घात केला
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मिठमुंबरी ते देवगड पवनचक्कीसमोरील सागरी क्षेत्रात घडली. समुद्रात अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि अजस्र लाटा उसळू लागल्या. या लाटांचा तडाखा बसल्याने 'अलमका' नौकेचा तोल गेला आणि पाहता पाहता ही मोठी बोट पाण्याखाली गेली. बोटीवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडला.
देवदूतासारखे धावून आले स्थानिक मच्छिमार
बोट बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात असलेल्या इतर मच्छिमारांनी कसलाही विचार न करता मदतीसाठी धाव घेतली. प्रतिकूल परिस्थितीत बचावकार्य राबवत त्यांनी बुडणाऱ्या खलाशांना सुखरूप बाहेर काढले. जर वेळेत मदत मिळाली नसती, तर या खलाशांचे काय झाले असते, हे सांगणे कठीण होते.
कोट्यवधींचे आर्थिक नुकसान
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी समाधानाची बाब आहे. मात्र, मौल्यवान मच्छिमारीची साधने आणि पूर्ण नौका समुद्रात बुडाल्याने मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत असून समुद्रातील वाढत्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.