Cargo Ship Fire: जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागून ते उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका भारतीय खलाशाने आपला जीव गमावला असून, इतर चार जण जखमी झाले आहेत.
असा घडला थरार; मदतीला धावले दुसरे जहाज
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लाकडी मालवाहू जहाजावर एकूण 18 भारतीय कर्मचारी कार्यरत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे जहाजावर गोंधळ उडाला आणि काही वेळातच जहाज समुद्रात उलटले. सुदैवाने, जवळून जाणाऱ्या दुसऱ्या एका जहाजाने तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले. 17 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना तातडीने उपचारासाठी दुबईला हलवण्यात आले आहे. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी जखमींच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.
चिनी तेलवाहू जहाजावरही हल्ला
याच दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका चिनी तेलवाहू जहाजावर ('जेव्ही इनोव्हेशनल') हल्ला झाल्याचे वृत्त आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर चिनी जहाजावर झालेला हा पहिला मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. मार्शल बेटांच्या ध्वजाखाली धावणाऱ्या या 173 मीटर लांब टँकरवर 22 कर्मचारी होते, ज्यात 10 हून अधिक चिनी नागरिकांचा समावेश होता. जहाजाचे मुख्य अभियंता लिऊ यांनी सांगितले की, डेकवर अचानक आग लागली, मात्र हा हल्ला नेमका कोणी आणि का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी, आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील वाढत्या हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
अमेरिका-इराण तणावाचे सावट
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मालवाहू जहाजाला लागलेली आग हा निव्वळ अपघात होता की घातपात, याचा तपास सध्या सुरू आहे.