Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने शुक्रवारी अत्यंत हिंसक वळण घेतले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या प्रचंड राड्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले असून, त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सत्तेच्या या संघर्षात भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने महायुतीमधील मित्रपक्षांमधील यादवी आता चव्हाट्यावर आली आहे.
पालकमंत्री देसाई जखमी; भाजपवर धक्काबुक्कीचा आरोप
जिल्हा परिषदेत मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि झटापट झाली. या गदारोळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला जखम होऊन रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई यांनी संताप व्यक्त केला. “गर्दीत नेमका धक्का कुणी दिला हे सुरुवातीला समजले नाही, पण हाताला जखम होऊन रक्त येऊ लागल्यावर दुखापतीची तीव्रता लक्षात आली,” असे त्यांनी नमूद केले. या प्रकारानंतर देसाई समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून, याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मकरंद पाटलांचा पोलिसांवर निशाणा
राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या सर्व प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. “पोलीस बळाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करून महायुतीमधीलच घटक पक्षांच्या सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर थेट कॅबिनेट मंत्र्यांवरच पोलीस आणि कार्यकर्ते धावून जात असतील, तर ही लोकशाहीची थट्टा आहे,” अशा शब्दांत पाटील यांनी प्रशासनाचा निषेध केला. निवडीच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रशासकीय दबावाचा आरोप आणि ‘रस्त्यावरच्या लढाई’चा इशारा
दुसरीकडे, आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. “आमच्या सदस्यांना मतदानाचा कायदेशीर अधिकार असतानाही पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून सभागृहाबाहेर काढले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून सदस्यांना धमकावण्यात आले आणि त्यांना विशिष्ट बाजूने मतदान करण्यास भाग पाडले,” असा खळबळजनक दावा शिंदेंनी केला आहे. या अन्यायाविरोधात आता शांत बसणार नाही, तर ‘रस्त्यावरची लढाई’ लढू, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.