Gopichand Padalkar on Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. एका जाहीर सभेत बोलताना पडळकरांनी थेट पश्चिम बंगालच्या राजकारणाचा दाखला देत विरोधकांचा समाचार घेतला. “जिथे ममता बॅनर्जींची सत्ता उलथवली जाऊ शकते, तिथे एका साध्या आमदाराचे टेन्शन घेण्याचे काय कारण?” असा खोचक सवाल पडळकरांनी केला. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या राजकीय गणितांना आणि टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
‘मेरी एन्ट्री लेट होती है, लेकिन ग्रेट होती है’
आपल्या भाषणादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणेच आक्रमक आणि फिल्मी अंदाज दाखवला. त्यांनी “मैंने बोला था ना, एन्ट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी!” हा संवाद ऐकवला. यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड जल्लोष केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आमचे आयुष्य नेहमी दिमाखात जगतो, म्हणूनच आमच्या केवळ नावानेही विरोधकांच्या मनात धडकी भरते. पडळकरांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर डोक्यावर घेतल.
दिग्गज नेते पाठीशी; काळजी करण्याचे कारण नाही
पडळकरांनी विरोधकांना सुनावताना सांगितले की, समोरच्या बाजूला काळजी करण्यासारखे काहीही कारण उरलेले नाही. सर्व मोठे आणि दिग्गज नेते सध्या आम्हाला थेट पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. असे असताना विरोधक केवळ एका आमदाराच्या मुद्द्यावरून उगाच कशासाठी काळजी करत आहेत, असा प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला. सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पडळकरांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.