Google ELS Service : भारतातील लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी गुगलने एक दिलासादायक बातमी आणली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी गुगलने भारतात 'इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस' (ELS) अधिकृतपणे सुरू केली आहे. या वैशिष्ट्यामुळे अपघात किंवा कोणत्याही संकटाच्या वेळी पोलीस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला वापरकर्त्याचे अगदी अचूक लोकेशन मिळणे शक्य होणार आहे.
उत्तर प्रदेशातून सेवेचा श्रीगणेशा
गुगलने या विशेष सेवेची सुरुवात सध्या उत्तर प्रदेशातून केली आहे. तेथील नागरिक आता आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून त्यांचे अचूक लोकेशन (ELS) पाठवू शकणार आहेत. लवकरच ही सेवा देशाच्या इतर राज्यांमध्येही विस्तारित केली जाणार आहे.
'ELS' तंत्रज्ञान कसे काम करते ?
ही सेवा वापरकर्त्याच्या फोनमधील GPS, वायफाय आणि सेल्युलर नेटवर्कचा वापर करते. यामुळे मदत देणाऱ्या यंत्रणेला वापरकर्त्याच्या 50 मीटर परिघातील अचूक लोकेशन मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फोनमध्ये इंटरनेट किंवा नेटवर्क कव्हरेज कमी असतानाही वापरकर्ते आपत्कालीन कॉल किंवा संदेश पाठवू शकतील. हे फिचर मशीन लर्निंगवर आधारित असून, अँड्रॉइडच्या 'फ्यूज्ड लोकेशन' तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्कालीन सेवा प्रदात्यांना सतर्क करते. ही सेवा अँड्रॉइड 6 आणि त्यावरील सर्व ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असेल.
2 कोटी कॉलवर यशस्वी चाचणी
गुगलने दावा केला आहे की, या सेवेची व्याप्ती आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी सुमारे 20 दशलक्ष (2 कोटी) कॉल आणि संदेशांवर तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, गुगलने अलीकडेच 'आपत्कालीन लाईव्ह व्हिडिओ' वैशिष्ट्य देखील सादर केले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते संकटकाळात त्यांचे थेट व्हिडिओ फीड शेअर करू शकतात.
हेही वाचा – Starlink Free Router : स्टारलिंककडून मोफत राऊटरची भेट! 'या' युजर्सना होणार फायदा; जाणून घ्या
संकटकाळी '112' ठरणार अधिक प्रभावी
भारतातील एकात्मिक आपत्कालीन क्रमांक 112 शी ही प्रणाली जोडण्यात आली आहे. यामुळे जेव्हा एखादा वापरकर्ता 112 वर कॉल करेल, तेव्हा त्याच्या फोनमधील ईएलएस (ELS) आपोआप सक्रिय होईल आणि नियंत्रण कक्षाला त्याचे लोकेशन पाठवले जाईल. यामुळे शोध आणि बचाव कार्यातील अडचणी कमी होऊन मौल्यवान वेळ वाचणार आहे.