Asaduddin Owaisi On Navneet Rana: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आता ‘लोकसंख्या’ आणि ‘नात्यांमधील वादा’वरून राजकीय ठिणगी पडली आहे. एमआयएम (MIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीच्या सभेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. ‘तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला. तुम्ही किती मुले जन्माला घालावीत हा तुमचा प्रश्न आहे, आम्हाला त्याशी देणेघेणे नाही,’ असे म्हणत त्यांनी नवनीत राणांना प्रत्यूत्तर दिलं आहे.
लोकसंख्येच्या विधानावर ओवैसींचा पलटवार
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी हिंदूंना किमान 4 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. त्यावर भाष्य करताना ओवैसी म्हणाले, ‘एकीकडे मोहन भागवत मुले जन्माला घालण्यास सांगतात, तर दुसरीकडे नवनीत राणा 4 मुलांचे लक्ष्य देतात. मी म्हणतो तुम्ही 8 मुले जन्माला घाला, आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे केवळ लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी केलेले द्वेषाचे राजकारण आहे.’ अशा वक्तव्यांमुळे बेरोजगारी आणि विकासासारखे महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवारांना ‘काका-पुतण्या’ वादावरून चिमटा
केवळ भाजपच नाही, तर ओवैसींनी अजित पवारांनाही टीकेचे लक्ष्य केले. ‘जे स्वतःच्या काकांचे (शरद पवार) होऊ शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता ‘घड्याळाची’ वेळ संपली असून सर्वत्र ‘पतंग’ उडवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी मतदारांना एमआयएमच्या पारड्यात मते टाकण्याचे आवाहन केले. नेहमीप्रमाणे होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ओवैसी म्हणाले, ‘लोक मला भाजपची ‘बी टीम’ म्हणतात. पण मी कोणाचीही टीम नाही. मी केवळ अल्लाचा बंदा आहे आणि जनतेच्या हक्कासाठी काम करायला आलो आहे.’