Pregnant Woman and Baby Death in Gadchiroli : महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे झेपावण्याच्या गप्पा मारल्या जात असताना गडचिरोलीतील ग्रामीण वास्तव मात्र अंगावर शहारे आणणारे आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील 9 महिन्यांची गरोदर माता आशा संतोष किरंगा यांना प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटातील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही प्राण सोडले. विकासाचे मोठमोठे प्रकल्प आणि 'स्टील सिटी'चे स्वप्न रंगवले जात असताना एका महिलेचा अशा प्रकारे झालेला अंत प्रशासकीय व्यवस्थेचे भीषण अपयश अधोरेखित करतो.
गावात पक्का रस्ता नसल्यामुळे आशा किरंगा यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जंगलाच्या वाटेने चालत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. या कष्टाच्या पायपिटीचा त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने हेडरी येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत रक्तदाब वाढल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दुर्दैवाचा फेरा मृत्यूनंतरही थांबला नाही; शवविच्छेदनासाठी एटापल्ली येथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांचे पार्थिव पुन्हा 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले, ज्यामुळे जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यूनंतरही सुरूच राहिली.
हेही वाचा – Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?
या हृदयद्रावक घटनेनंतर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. मात्र, आरोग्य विभागाने या मृत्यूसाठी प्रशासकीय कमतरता मान्य करण्याऐवजी मातेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. डॉ. शिंदे यांच्या दाव्यानुसार, आरोग्य विभाग आशा किरंगा यांच्या नियमित संपर्कात होत्या आणि त्यांच्या प्रसूतीची तारीख जानेवारीच्या शेवटी होती. मात्र, त्या उपचारासाठी एका पुजाऱ्याकडे गेल्या होत्या आणि तिथे मुक्काम केल्याने प्रकृती अधिक बिघडली, असा वेगळाच निष्कर्ष आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला आहे.
1 जानेवारीच्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री 1 वाजता प्रकृती ढासळल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना नेण्यात आले असले, तरी वेळेवर रस्ते आणि सोयीसुविधांचा अभाव ही बाब आता लपून राहिलेली नाही. एकीकडे आधुनिकतेच्या गप्पा आणि दुसरीकडे प्रसूतीसाठी रस्ता नसल्याने गरोदर मातेला जीव गमवावा लागणे, हे चित्र मन सुन्न करणारे आहे. या माय-लेकांच्या मृत्यूने गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले असून स्थानिक नागरिकांनी व्यवस्थेच्या या उदासीनतेचा निषेध केला आहे.
हेही वाचा – Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…