Women's Day 2026: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) पुणेकर आणि पर्यटकांसाठी एक खास उपक्रम जाहीर केला आहे. येत्या रविवारी, 8 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त विशेष 'पर्यटन बससेवा' आयोजित करण्यात आली असून, केवळ 500 रुपयांत पुणे शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवता येणार आहे.
8 विशेष पर्यटन बसेसचे नियोजन
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए (PMRDA) क्षेत्रातील नागरिकांना शहराच्या वैभवाची ओळख करून देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 8 विशेष पर्यटन बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणांचा या सहलीत समावेश असेल. जरी हा उपक्रम महिला दिनानिमित्त राबवला जात असला, तरी ही सेवा केवळ महिलांसाठीच मर्यादित नसून सर्व वयोगटातील नागरिक, कुटुंबे आणि मित्र-मैत्रिणींसाठी खुली आहे.
सहल कधी आणि कुठून?
तारीख: रविवार, 8 मार्च 2026 (महिला दिन)
वेळ: सकाळी 8 वाजता सर्व बसेस मार्गस्थ होतील.
ठिकाण: स्वारगेट मुख्य बसस्थानक येथून सहलीला सुरुवात होईल.
शुल्क: प्रति व्यक्ती फक्त 500 रुपये.
बुकिंग आणि संपर्क
या पर्यटन फेरीसाठी जागा मर्यादित असल्याने नागरिकांना आगाऊ नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी नागरिक पर्यटन बससेवा समन्वयक तिनिष गुरव (मोबाईल: 9850402663) यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. पुणेकरांसाठी सुट्टीचा आनंद द्विगुणित करणारी ही विशेष सहल नक्कीच संस्मरणीय ठरेल, असा विश्वास पीएमपीएमएल प्रशासनाने व्यक्त केला आहे.