Former mayor Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवार यादीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांनी ज्या वॉर्ड क्रमांक 199 चे प्रतिनिधित्व केले आहे. तेथूनच त्या पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आतापर्यंत ठाकरे गटाने एकूण 55 जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत.
वॉर्ड 199 साठी पर्यायी नावाची चाचपणी
वॉर्ड क्रमांक 199 येथून आता नवीन नाव चर्चेत आले आहे. शाखा क्रमांक 199 चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे यांनी ‘मातोश्री’वर लावलेली उपस्थितीच बरेच काही सांगून जात आहे का, असाही एक विचार समोर येत आहे. पेडणेकर यांना पुन्हा संधी मिळणार की पक्षाकडून अबोली खाडे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘मातोश्री’वर धाव, पण पदरी निराशा?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी एकूण 55 शिवसैनिकांना अधिकृत ‘एबी’ (AB) फॉर्मचे वाटप केले आहे. उमेदवारी मिळालेल्या नेत्यांमध्ये उत्साह असतानाच किशोरी पेडणेकर यांचे नाव या यादीत नसल्याचे समोर आले. मंगळवारी स्वतः पेडणेकर ‘मातोश्री’वर दाखल झाल्या होत्या, मात्र यादी जाहीर झाल्यावर बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.
उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
पेडणेकर या पक्षाच्या अत्यंत आक्रमक नेत्या मानल्या जातात, तरीही त्यांना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. उमेदवारी नाकारण्यामागे काही अंतर्गत राजकीय समीकरणे आहेत की दुसऱ्या यादीत त्यांचे नाव येणार, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे कोणता कौल देतात, यावर पेडणेकरांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
मनसेच्या गोटातही हालचालींना वेग
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (MNS) निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. मनसेचे अधिकृत ‘एबी’ फॉर्म आज दुपारी पक्षाचे मुख्य कार्यालय ‘राजगड’ येथून दिले जाणार आहेत. मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या उपस्थितीत हे वाटप होईल. ज्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्यांना आगाऊ कल्पना देण्यात आली असून शिस्तीत फॉर्म स्वीकारण्याच्या सूचना पक्षाने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.