Ramdas Kadam: ‘खासदार तर दूरच, त्यांच्या केसालाही धक्का लावून दाखवा…’; रामदास कदमांचे संजय राऊतांना आव्हान

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Ramdas Kadam: ‘खासदार तर दूरच, त्यांच्या केसालाही धक्का लावून दाखवा…’; रामदास कदमांचे संजय राऊतांना आव्हान

Ramdas Kadam: शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत यांच्या विधानांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्यांनी ‘ऑपरेशन तुडवा’ अशी भाषा केली असली, तरी आम्ही अस्सल शिवसैनिक आहोत. आमच्या वाटेला गेल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा कडक इशारा कदमांनी दिला. राऊतांनी आपले तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसैनिक घरात घुसून चोख उत्तर देतील, असे सांगत त्यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे.

‘एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे खरे वाघ’ 
शिवसेनेच्या 57 वर्षांच्या प्रवासाचे साक्षीदार असल्याचे सांगत रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उद्धवजी, आज तुमच्यावर ही वेळ का आली, याचा विचार करा. आधी आमदार गेले, आता खासदार गेले आणि भविष्यात उरलेले लोकही सोडून जातील,” असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे खरे ‘टायगर’ एकनाथ शिंदेच असून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आहे. जर शिंदे यांनी दोन तृतीयांश आमदारांसह हे पाऊल उचलले नसते, तर शिवसेनेचे अस्तित्वच संपले असते, असेही कदम म्हणाले.

हेही वाचा – Eknath Shinde: ‘कुत्रे टोळक्याने येतात, पण वाघ एकटाच येतो…’; शिवसेना वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला इशारा

‘श्रीकांत शिंदेंना युवासेना प्रमुख करा’ 

शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना रामदास कदम यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. पक्षात श्रीकांत शिंदे यांचे योगदान खूप मोठे असल्याचे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली. “श्रीकांत शिंदे यांच्याकडे युवासेनेचे प्रमुखपद सोपवण्यात यावे आणि त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करावी,” अशी विनंती कदमांनी केली. यासोबतच, “पूर्वी आम्हाला नाईलाजाने आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावे लागायचे,” अशी खंत व्यक्त करत त्यांनी ठाकरेंच्या घराणेशाहीवर निशाणा साधला.

‘संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंची अधोगती’ 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजकीय घसरगुंडीला संजय राऊत हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. राऊतांच्या अशा वर्तनामुळेच महायुतीचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या अहोरात्र चालणाऱ्या कामाचा गौरव करताना, “आमचा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे म्हणत त्यांनी शिंदेचे अभिनंदन केले. शेवटी, ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजती दात’ या ओळींचा दाखला देत, राऊतांनी शिवसैनिकांच्या नादी लागू नये, असा थेट इशारा त्यांनी दिला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number