Pune Mayor: महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन तृतीयांश बहुमतासह एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 'महापौर' या पदाकडे लागले आहे. दोन वेळा सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेले हे पद यंदा कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून भाजपमधील दिग्गज नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
दिग्गजांची नावे चर्चेत: कुणाची वर्णी लागणार?
भाजपमध्ये अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे निवडीसाठी पक्षासमोर मोठे आव्हान असेल. सध्या शहरातील अनुभवी चेहरे माजी शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच महिला नेतृत्वात महिलांमधून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे आणि मंजूषा नागपुरे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. याशिवाय, इतर दावेदारात राजेंद्र शिळीमकर, प्रसन्न जगताप, अनिल टिंगरे आणि योगेश मुळीक हे देखील स्पर्धेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झालेले पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल आणि सचिन दोडके यांच्याकडेही पालिकेतील प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे डोळे
नवे नगरसेवक निवडून आले असले तरी, जोपर्यंत महापौरपदाचे आरक्षण (सोडत) जाहीर होत नाही, तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. हे पद 'खुला प्रवर्ग' (General), 'महिला' की 'मागास प्रवर्ग' यासाठी राखीव असणार, यावरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रक्रियेसाठी साधारण 2 ते 3 आठवड्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे.
एकेकाळी महापालिकेत कायम विरोधी बाकांवर बसणाऱ्या भाजपने 2017 मध्ये 97 जागांसह प्रथमच सत्ता मिळवली होती. त्यावेळी दिवंगत मुक्ता टिळक आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. आता सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या विजयानंतर पक्ष पुन्हा एकदा एखाद्या निष्ठावान आणि आक्रमक नेत्याला संधी देणार की नवीन प्रयोगाला प्राधान्य देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.