Mymensingh Violence : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या 10 दिवसांत तिसऱ्या हिंदू तरुणाला संपवण्यात आले असून, या ताज्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे ही घटना घडली असून, बजेंद्र बिस्वास (42) नावाच्या हिंदू तरुणाला गोळ्या घालून संपवण्यात आलं आहे.
सहकाऱ्यानेच झाडली गोळी
मिळालेल्या माहितीनुसार, बजेंद्र बिस्वास हे बांगलादेशातील 'अन्सार' या निमलष्करी दलाचे सदस्य होते आणि भालुका येथील एका कापड कारखान्यात सुरक्षेसाठी तैनात होते. त्याच कारखान्यात त्यांच्याच एका सहकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. अन्सार हे दल ग्रामीण भागात संरक्षण युनिट म्हणून काम करते.
हेही वाचा – khaleda zia Passed Away : बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन
मैमनसिंग जिल्हा पुन्हा हादरला
विशेष म्हणजे, ही घटना त्याच मैमनसिंग जिल्ह्यात घडली आहे जिथे 18 डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाला अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं होतं. दीपू चंद्र दास यांना आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर भर चौकात जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेची जखम ताजी असतानाच बजेंद्र यांच्या मृत्यूमुळे हिंदू समुदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
10 दिवसांतील तिसरी हत्या
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू तरुणांना लक्ष्य केले जात आहे:
18 डिसेंबर: दीपू चंद्र दास यांना जाळून संपवण्यात आलं.
27 डिसेंबर: ढाका येथे अमृत मंडल नावाच्या तरुणाला गोळ्या झाडण्यात आल्या.
28-29 डिसेंबर: बजेंद्र बिस्वास यांना गोळ्या घालण्यात आल्या.
हेही वाचा – Putin drone attack : मोठी बातमी! पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ले, युक्रेनने मात्र हात झटकले
दहशतीखाली हिंदू समुदाय
बांगलादेशात केवळ हिंदूंना संपवण्यात येत नसून त्यांची घरे जाळली जात असल्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान केले जात असल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ढाका येथे संपवण्यात आलेल्या अमृत मंडलवर खंडणीचा आरोप करण्यात आला होता, मात्र अशा प्रकारे होत असलेल्या कृत्यांमागे नियोजित कट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सततच्या हिंसाचारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशातील मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.