FBI Warns Iran Drone Attack California : अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था FBI ने एक खळबळजनक इशारा दिला असून, इराण आता थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्निया राज्यावर इराणकडून आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याने संपूर्ण अमेरिकेत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा सूड घेण्यासाठी इराणने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
आत्मघातकी 'कामीकाझे' ड्रोनचा धोका
FBI च्या गुप्तचर अहवालानुसार, इराणचे लष्करी गट कॅलिफोर्नियातील महत्त्वाच्या आस्थापना आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी प्रगत 'कामीकाझे' ड्रोनचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे, इराण एका अज्ञात जहाजाद्वारे अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ हे घातक ड्रोन पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी आखाती देशांतील अमेरिकन तळांवर आणि दूतावासांवर अशाच ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले होते, ज्यांना थोपवण्यात अमेरिकन यंत्रणांना मर्यादा आल्या होत्या. आता हाच धोका अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसमोर उभा ठाकला आहे.
कॅलिफोर्निया राज्यावरच निशाणा का?
तज्ज्ञांच्या मते, कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संरक्षण संस्थांची कार्यालये आहेत. इराणने यापूर्वी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले असले तरी, आता त्यांचे लक्ष्य अमेरिकेच्या आर्थिक आणि तांत्रिक कणा असलेल्या भागाला हानी पोहोचवणे हे आहे. अमेरिका आणि इराणमधील संबंध सध्या युद्धजन्य परिस्थितीत पोहोचले असून, अमेरिकेच्या भूमीवर थेट हल्ला करण्याची इराणची ही पहिलीच मोठी आणि धाडसी योजना असल्याचे बोलले जात आहे.
सुरक्षा यंत्रणा आणि हवाई दल सज्ज
FBI च्या या इशाऱ्यानंतर केवळ कॅलिफोर्नियातच नव्हे, तर संपूर्ण अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्व प्रमुख विमानतळ, बंदरे आणि सरकारी इमारतींभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींना तोंड देण्यासाठी अमेरिकन हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावरून होणाऱ्या संभाव्य घुसखोरीवर बारीक नजर ठेवण्यासाठी प्रगत रडार यंत्रणा आणि गस्ती पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.