Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण आकारास येत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 8 खासदार उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आगामी मतदारसंघांच्या पुनर्रचना म्हणजेच 'डिलिमिटेशन' (Delimitation) विधेयकावर चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. परंतु, या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुंबई ते कोल्हापूर विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील हे तिघे एकत्र प्रवास करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विमान प्रवासाची चर्चा आणि महाविकास आघाडीतील धुसफूस
कोल्हापूर व सांगली दौऱ्याच्या निमित्ताने झालेल्या या एकत्र विमान प्रवासामुळे शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या जवळ जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत "मोदी-शाहांच्या दरबारी बैठका सुरू असून काहीतरी शिजत आहे," असा टोला लगावला. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, आमचे खासदार डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील, तर खासदार संजय राऊत यांनी पवार गट महाविकास आघाडीचाच भाग राहील असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांतील महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठींचा घटनाक्रम
3 जुलै 2026: मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली, ज्यामुळे पक्षांतर व आघाडीच्या चर्चांना प्रथम हवा मिळाली.
7 जुलै 2026: विधानभवनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट सीमाप्रश्नावर आधारित सदिच्छा भेट असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.
20 जुलै 2026: जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती.
23 जुलै 2026: या घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, तर 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
या लागोपाठ घडलेल्या घटना आणि अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, या सर्व धाग्यादोन्यांमुळे महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयास येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.