Raj Thackeray: सध्याच्या देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. चालू असलेले फोडाफोडीचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि गलिच्छ असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सत्तेची ऊब कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही, याचे भान नेत्यांनी ठेवले पाहिजे. आज ज्या काही चुकीच्या पद्धती रूढ केल्या जात आहेत, त्याचे गंभीर परिणाम भविष्यात खुद्द भाजपलाच सहन करावे लागतील, असा स्पष्ट इशारा ठाकरेंनी दिला.
मोदींचा वरदहस्त हटताच कोसळणार संपूर्ण साम्राज्य
भाजपच्या सद्यस्थितीची तुलना पत्त्यांच्या बंगल्याशी करताना राज ठाकरे यांनी एक मार्मिक उदाहरण दिले. ते म्हणाले की, या राजकीय बंगल्याचा सर्वात खालचा आणि मुख्य आधार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. सध्या भाजपमध्ये जे काही वैभव आणि टिकून राहिलेली शक्ती दिसते आहे, ती केवळ मोदींच्या नावामुळेच आहे. ज्या दिवशी हा मुख्य पत्ता बाजूला होईल, त्या क्षणी हा संपूर्ण बंगला पत्त्यांसारखा कोसळल्याशिवाय राहणार नाही. अमित शाह यांच्या रणनीतीतून हे सर्व राजकारण घडवले जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
अंतर्गत बंडाळीचा इतिहास पुनरावृत्त होणार?
दरम्यान, जगाच्या इतिहासाचा दाखला देत राज ठाकरे यांनी भाजपला अंतर्मुख होण्याचा सल्ला दिला. जगात जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांनी आपले सर्व विरोधक नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांच्या स्वतःच्याच पक्षात नवे शत्रू निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले. आणीबाणीच्या काळातही हेच घडले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. सध्या भाजपमध्येही नेमकी हीच प्रक्रिया सुरू झाली असून, बाहेरचे विरोधक संपवता संपवता पक्षातच अंतर्गत विरोधक डोके वर काढतील. सत्तेच्या अवाजवी अहंकारातून असे निर्णय घेतले जात असून, आगामी काळात याचे पडसाद अगदी खालच्या पातळीपर्यंत उमटलेले दिसतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.