Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करत महत्त्वाचे विधान केले आहे. "हा दिवस आम्हा सर्वांच्या मनावर एक जड ओझे बनून राहिला आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या निष्पाप जीवांचे प्राण दहशतवाद्यांनी हिरावून घेतले, ही घटना आजही आमच्या स्मरणात आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पीडित कुटुंबांच्या दुःखात प्रशासन आजही सहभागी असून अशा शोकांतिका पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या कारवायांना रोखणार
दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला खडे बोल सुनावताना मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले, "पाकिस्तानची इच्छा असली असे हल्ले घडवून आणण्याची त्यांची मनीषा असली तरीही आम्ही त्यांना तसे घडू देणार नाही. हाच आमचा अटूट संकल्प आहे." परिस्थिती स्थिर आणि शांत ठेवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही कटाचा आम्ही धैर्याने सामना करू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पर्यटनावर झालेला परिणाम आणि पुनरुज्जीवनाची आशा
पहलगाम हल्ल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत पर्यटनावर काहीसा किरकोळ परिणाम झाला असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, आगामी काळात पर्यटनाचा हंगाम जोमाने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माता वैष्णोदेवीचे दर्शन, अमरनाथ यात्रा आणि सामान्य पर्यटनासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरमध्ये येतील आणि खोऱ्यात पुन्हा एकदा चैतन्य पसरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Rajnath Singh: 'शेजारील सगळेच देश चांगले, पण…'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
इराण-अमेरिका संघर्षावर चिंता
जागतिक घडामोडींवर भाष्य करताना उमर अब्दुल्ला यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. "हा संघर्ष आता थांबायला हवा, कारण याचा परिणाम तेलाच्या किमतींवर आणि जागतिक पुरवठ्यावर होत आहे," असे ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलने इराणावर केलेल्या हल्ल्याचा उद्देश अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगत त्यांनी या युद्धाचा निषेध केला. शेजारील देशांच्या तुलनेत भारताची स्थिती आजही अधिक मजबूत आणि स्थिर असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.