EPFO Updates: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व सदस्यांसाठी नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची ताकीद जारी केली आहे. तुमच्या कष्टाची कमाई असलेल्या पीएफ (PF) खात्याच्या सुरक्षेसाठी ही सूचना पाळणे अनिवार्य आहे. ईपीएफओ पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या माहितीनुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या खात्याशी संबंधित माहिती आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. विशेषतः पीएफ खात्याची सुरक्षा थेट तुमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेली असल्याने, ईपीएफओने सर्व सदस्यांना त्यांचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तातडीने तपासून पाहण्याचे आवाहन केले आहे.
मोबाईल क्रमांक स्वतःचाच असणे अनिवार्य; अन्यथा हॅकिंगचा धोका
ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, जर तुमच्या पीएफ खात्यात नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक तुमचा स्वतःचा नसेल, तर तो त्वरित बदलून स्वतःचा क्रमांक अद्ययावत (Update) करणे आवश्यक आहे. विसरलेला पासवर्ड पुन्हा मिळवणे, खात्यातील शिल्लक तपासणे आणि कंपनीने जमा केलेल्या पैशांचे अपडेट्स मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक महत्त्वाचा असतो. जर तुमच्या खात्यात दुसऱ्या कोणाचा क्रमांक असेल, तर तुमच्या आर्थिक व्यवहारांची सर्व गोपनीय माहिती त्या व्यक्तीला मिळत राहील, ज्यामुळे तुमचे खाते हॅकिंग किंवा फसवणुकीला बळी पडण्याची दाट शक्यता आहे.
'आधार'शी (Aadhaar) जोडलेला मोबाईल क्रमांकच ठरणार महत्त्वाचा
ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार, 'ई-नामांकन' (E-nomination) आणि क्लेम सेटलमेंट करण्यासाठी केवळ आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकच ग्राह्य धरला जाणार आहे. जर तुमचा पीएफ खात्यातील क्रमांक आधारशी जोडलेला नसेल, तर तुम्हाला क्लेम दाखल करताना अडचणी येऊ शकतात. केवायसी (KYC) अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणारा 'वन-टाइम पासवर्ड' (OTP) केवळ आधारशी लिंक असलेल्या क्रमांकावरच पाठवला जातो. त्यामुळे सदस्यांनी आपला आधार-लिंक्ड मोबाईल क्रमांकच ईपीएफओ पोर्टलवर नोंदवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
एकापेक्षा जास्त UAN असल्यास करा 'हे' काम
ज्या कर्मचाऱ्यांकडे जुन्या कंपन्यांमधील एकापेक्षा जास्त 'युनिव्हर्सल अकाउंट नंबर' (UAN) आहेत, त्यांच्यासाठीही ईपीएफओने महत्त्वाची सूचना दिली आहे. सदस्यांनी विलंब न करता आपला जुना UAN सध्याच्या चालू UAN मध्ये हस्तांतरित (Transfer) करण्यासाठी अर्ज करावा. सर्व खात्यांचे एकत्रीकरण केल्यामुळे पीएफ व्यवस्थापन सोपे होते आणि भविष्यात पेन्शन किंवा पैसे काढताना तांत्रिक अडचणी येत नाहीत. अधिकृत माहितीसाठी सदस्यांनी केवळ ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.