Rajya Sabha Election 2026: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जून आणि जुलै 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या 24 राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी द्विवार्षिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. 10 वेगवेगळ्या राज्यांमधून निवडून आलेल्या या 24 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ याच कालावधीत संपणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या 10 राज्यांमधील जागांसाठीचे मतदान 18 जून 2026 रोजी पार पडेल. जून 2026 मध्ये 10 राज्यांमधील 24 जागा रिक्त होत असून, इतर 2 राज्यांमधील जागा यापूर्वीच रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने आज एक अधिसूचना प्रसिद्ध करून अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि झारखंड या राज्यांमधील 22 खासदार (MPs) 1 जून रोजी निवृत्त होणार आहेत. याव्यतिरिक्त, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, वरील नमूद केलेल्या राज्यांमधील विद्यमान खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै या कालावधीतील वेगवेगळ्या तारखांना संपत आहे.
रिक्त जागा आणि निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
या निवडणुकीत आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी 4 जागा रिक्त होतील. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी 3 खासदार निवृत्त होतील, तर झारखंडमधून 2 खासदार निवृत्त होतील. मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या राज्यांमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक घेतली जाईल. निवृत्त होणाऱ्या खासदारांपैकी 11 खासदार भाजपचे, तर 4 खासदार काँग्रेसचे आहेत; उर्वरित 9 खासदार इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 8 जून आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 9 जून रोजी होईल आणि उमेदवार 11 जून रोजी आपले अर्ज मागे घेऊ शकतील. मतदान 18 जून रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 या वेळेत पार पडेल. मतमोजणी त्याच दिवशी म्हणजेच 18 जून रोजी होईल आणि राज्यसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
हे 24 खासदार राज्यसभेचा निरोप घेणार
या निवडणुकीसोबतच अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा समावेश आहे. राज्यनिहाय निवृत्त होणाऱ्या सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
आंध्र प्रदेश – अयोध्या रामी रेड्डी अल्ला, परिमल नथवाणी, पिल्ली सुभाषचंद्र बोस आणि सना सतीश बाबू.
गुजरात: रामभाई हरजीभाई मोकारिया, नरहरी हिराभाई अमीन, शक्तीसिंहजी हरिश्चंद्रसिंहजी गोहिल आणि रमीला बेचरभाई बारा.
कर्नाटक: नारायण कोरागप्पा, इरन्ना कडडी, एच.डी. देवेगौडा आणि मल्लिकार्जुन खर्गे.
मध्य प्रदेश: जॉन कुरियन, दिग्विजय सिंह आणि सुमेर सिंह सोलंकी.
राजस्थान: नीरज डांगी, राजेंद्र गहलोत आणि रवनीत सिंह बिट्टू.
झारखंड: दीपक प्रकाश आणि शिबू सोरेन.
मणिपूर व मेघालय : महाराजा सनाजाओबा लेशेम्बा (मणिपूर) आणि वानवेरॉय खारलुखी (मेघालय).
अरुणाचल प्रदेश : नबम रेबिया.
मिझोरम : के. वनलालवेना.