Latur Politics: लातूरमध्ये एकनाथ शिंदेंचे महाशक्तीप्रदर्शन; माजी आमदारासह 25 हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित शिवसेनेच्या एका विराट मेळाव्यात एकाच वेळी तब्बल 25,000 कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा धरला.

Latur Politics: लातूरमध्ये एकनाथ शिंदेंचे महाशक्तीप्रदर्शन; माजी आमदारासह 25 हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Latur Politics: आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठवाड्याच्या राजकारणाला अत्यंत मोठी आणि अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित शिवसेनेच्या एका विराट मेळाव्यात एकाच वेळी तब्बल 25,000 कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा धरला. माजी आमदार विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमालीची वाढली असून, स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

‘हा जनसागर भाडोत्री नाही’; शिंदेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर
या भव्य महासोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार प्रहार केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीमुळे हा सोहळा 1 दिवस पुढे ढलावा लागला होता, अशी माहिती देत शिंदेंनी सभेतील अलोट गर्दीवरून विरोधकांना सुनावले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “हा आजवरचा सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा ठरला आहे. इथली अथांग गर्दी पैसे देऊन किंवा गाड्या पाठवून गोळा केलेली नाही, तर ती विनायकरावांवरील प्रेमापोटी स्वतःहून आली आहे. ज्या विरोधकांच्या डोळ्यात राजकीय कावीळ झाली आहे, त्यांनी अहमदपूरला येऊन हा जनसागर डोळे उघडून बघावा. जनतेचे हे प्रेम कधीच विकत घेता येत नाही.”

हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींचा मास्टरस्ट्रोक! इंधन दरवाढीची चर्चा थेट रिक्षाचालकांसोबत; सरकारसमोर मांडणार व्यथा, कष्टकऱ्यांना दिलं आश्वासन

महामेळाव्यातील प्रमुख नेते आणि शासकीय उपस्थिती
या भव्य राजकीय सोहळ्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह सुमारे 25,000 कार्यकर्ते आणि समर्थकांनी अधिकृत प्रवेश केला. या मेळाव्याला शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि आनंद परांजपे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. याशिवाय, शासकीय पातळीवरून जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील आणि आमदार मंगेश कुडाळकर यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.

विकासाच्या राजकारणाला मिळणार गती
दरम्यान, सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी विनायक पाटील यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा विशेष गौरव केला. “विनायकरावांच्या नावातच ‘विनायक’ (गणपती) असल्याने, ते आजपासून त्यांच्या राजकीय प्रवासाचा एक नवा ‘श्रीगणेशा’ करत आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. पाटील यांनी यापूर्वी मंत्री आणि आमदार म्हणून जनतेची उत्तम सेवा केली असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सर्वसामान्यांच्या विकासाच्या राजकारणाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला माजी आमदार सुधाकर भालेराव, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासह प्रचंड संख्येने महिला, शेतकरी आणि तरुण वर्ग उपस्थित होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number