Eknath Shinde On Thackeray Alliance : महायुती ही महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात आहे, मात्र ठाकरे बंधूंची ही युती केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी केलेली स्वार्थाची तडजोड आहे, अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा समाचार घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीवर भाष्य करताना शिंदे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंना घेरले. ते म्हणाले, या मंडळींनी मुंबई महापालिकेकडे आजवर केवळ 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' म्हणून पाहिले. आता ही कोंबडीच कापून खायचा यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, मुंबईकर सुज्ञ आहेत, ते या सत्तेसाठी हापापलेल्या वृत्तीला ओळखून आहेत. ठाकरे बंधू कितीही एकत्र आले तरी 'विठ्ठल' (जनता आणि आशीर्वाद) आमच्याच बाजूने आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार
दरम्यान, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणुका आल्या की यांना मराठी माणूस आठवतो. यांच्याच काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्यांच्या पुनर्वसनासाठी यांनी काय केले? आम्ही रमाबाई आंबेडकर नगरमधील 17,000 घरांचा प्रश्न मार्गी लावला आहे. आमचा अजेंडा विकास आहे, पण त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विकासावर एक शब्दही उमटला नाही, अशी टीका शिंदेंनी केली.
आपली पोरं सांभाळता येत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार?
बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे, असे म्हणत शिंदेंनी वैयक्तिक हल्लाही चढवला. जे आपली मुले सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? कोरोनाच्या संकटातही यांनी केवळ पैसे खाण्याचे काम केले, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. तसेच, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही 'भावनिक भीती' दाखवून मते मिळवण्याचे जुने धंदे आता चालणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पुढच्या ६ महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त
मुंबईकरांच्या हितासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, आम्ही निर्णयांचे सरकार आहोत. येत्या सहा महिन्यांत मुंबईला खड्ड्यांपासून पूर्णपणे मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. नगरपालिकेच्या निकालात जनतेने 'असली आणि नकली' यातील फरक स्पष्ट केला आहे, तोच कल आगामी निवडणुकीतही दिसेल.