Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोडी समोर आली आहे. कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक भेट घेतल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत नाराज झाले आहेत. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि नुकतेच पक्षात समाविष्ट झालेले विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी घेतलेल्या या परस्पर भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी थेट विचारणा करत तीव्र शब्दांत स्पष्टीकरण मागितले आहे. या राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
भाजप नेत्यांच्या हरकतीनंतर शिंदेंचे कडक पाऊल; वरिष्ठ स्तरावर चर्चांना उधाण
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या चर्चेबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महायुतीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी कॉकरोच जनता पक्षाच्या प्रमुखांना भेटणे राजकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचा आक्षेप भाजप नेत्यांनी घेतला होता. भाजपकडून आलेल्या या नाराजीच्या सुरांनंतर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पावले उचलत शिरसाट आणि कडू यांना याबाबत विचारणा केली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा वरिष्ठांना विश्वासात न घेता ही भेट का घेण्यात आली, असा थेट सवाल शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दिपकेंच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांची रांग; प्रकृती बिघडल्याने घडामोडींना वेग
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि ते सातत्याने माध्यमांशी संवाद साधत असल्याने देशभरातील अनेक राजकीय नेते आणि समर्थक त्यांची विचारपूस करण्यासाठी हजेरी लावत आहेत. शनिवारी अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या भेटीच्या सत्रामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ही अंतर्गत नाराजी आगामी काळात राजकीय समीकरणांवर काय परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.