Eknath khadse Bjp Entry : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या भारतीय जनता पक्षातील संभाव्य घरवापसीवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाथाभाऊंच्या आगामी वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यात त्यांचा जाहीर भाजप प्रवेश होणार असल्याच्या वावड्या उठत असतानाच, स्वतः खडसेंनी थेट दिल्लीतील घडामोडींचा संदर्भ देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अलीकडेच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खडसे यांच्यात झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना खडसे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला फोन करून दिल्लीला बोलावले होते, अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामुळे पक्षप्रवेश रेंगाळल्याचा थेट आरोप
एकनाथ खडसे यांनी भाजपमधील अंतर्गत विरोधावर आणि त्यांना मिळालेल्या निरोपावर अत्यंत गंभीर बोट ठेवले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दिल्लीत गेलेलो असताना अमित शहा यांनी मला स्वतः भाजप जॉईन करो असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला वेगळाच निरोप देण्यात आला. वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले की, खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू, अशी थेट धमकी स्थानिक नेत्यांकडून दिली जात आहे. जर तुम्हाला पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे काम करणार नाहीत, अशी थेट ब्लॅकमेलिंग वरिष्ठ पातळीवर केली गेली. याच विरोधामुळे वरिष्ठांनी मला तूर्तास केवळ लोकसभेत भाजपचे काम करण्याचा सल्ला दिला आणि पुढील निर्णय नंतर घेऊ असे सांगितले. गिरीश महाजन म्हणतात की माझा खडसेंच्या प्रवेशाला विरोध नाही, मग मला पक्षात घेण्यास नेमका विरोध करतोय कोण, असा थेट प्रश्न खडसेंनी विचारला आहे.
विनोद तावडे व नितीन गडकरी यांच्यासोबतच्या भेटीवर स्पष्टीकरण
मुंबईत झालेल्या विनोद तावडे यांच्या भेटीबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी राजकीय चर्चेचे वृत्त फेटाळून लावले आहे. ही भेट केवळ एक औपचारिक स्वरूपाची होती आणि त्यांनी फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस केली, याव्यतिरिक्त आमच्यात दुसरा कोणताही राजकीय संवाद झाला नसल्याचे खडसे म्हणाले. या भेटीदरम्यान त्यांनी तावडे यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. यासोबतच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित केले असून, गडकरी साहेबांनी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला नक्की येईन असे आश्वासन दिल्याचे खडसेंनी आवर्जून सांगितले.
शरद पवारांसोबतच राहणार; आता भाजप प्रवेशात रस नसल्याची घोषणा
भाजप प्रवेशाच्या या संपूर्ण राजकीय नाट्यावर अखेर एकनाथ खडसे यांनी स्वतःहून पूर्णविराम लावला आहे. आता मला भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस राहिलेला नाही, अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली आहे. आपण पूर्णपणे शरद पवार यांच्यासोबत असून, शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी ठाम राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्वतः भाजपमध्ये जाणार नसलो तरी आपले कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असून, माझे कार्यकर्ते त्या पक्षात जातील, मी नाही, असे सांगत त्यांनी आपली अंतिम भूमिका जाहीर केली आहे.
हेही वाचा – Pravin Darekar: 'तुमची उंची आणि कुवत किती?'; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा