Delhi Blast Update: दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासयंत्रणांनी अल फलाह विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका आणि जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या कथित कमांडर डॉ. शाहीनच्या फ्लॅटमधून तब्बल 18.5 लाख रुपये रोख, दोन सोन्याची बिस्किटे, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेमसंबंध आणि दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचे धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत.
भारतात ‘व्हाईट कॉलर’ टेरर मॉड्यूलचा हिस्सा
तपासानुसार, शाहीन 2014 ते 2018 दरम्यान सौदी अरेबियातील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. भारतात परतल्यानंतर ती सलग तीन वर्षे बेरोजगार राहिली, मात्र या काळात तिने दहशतवादी संघटनांशी संबंध दृढ केले आणि पुढील कारवायांसाठी आर्थिक मदतही मिळवली.
डॉ. मुझम्मिलशी जवळीक
दरम्यान, 2021 मध्ये अल फलाह विद्यापीठात रुजू झाल्यानंतर तिने ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’चा भाग म्हणून इतर डॉक्टरांशी संपर्क साधला. याच दरम्यान तिच्या डॉ. मुझम्मिलशी जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांची जवळीक प्रेमसंबंधात बदलली आणि ते लग्नापर्यंत पोहोचले. तपास टीमच्या मते, या नात्यामागे दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा हेतूही होता.
हेही वाचा – Nanded Crime News: कुटुंब हरलं, प्रेम जिंकलं; नांदेडमध्ये प्रेयसीने केले प्रियकराच्या प्रेतासोबत लग्न
शाहीनचा डिजिटल लॉकर उघडताच तपास पथक चकित
जम्मू-कश्मीर पोलीस आणि दिल्ली स्पेशल सेलच्या संयुक्त तपासादरम्यान शाहीनच्या फ्लॅट क्रमांक 32 मधील डिजिटल लॉकरचे अस्तित्व समोर आले. एनआयए पथकाला ते उघडता येत नसल्याने शाहीनला बोलावण्यात आले. तीने लॉकर उघडताच एकामागून एक पॅकेट बाहेर येऊ लागली. प्रत्येक पॅकेट खाकी टेपने वेढलेले होते. पॅकेट उघडताच त्यात मोठ्या प्रमाणावर 500 च्या नोटा आढळल्या. सर्व पॅकेट तपासल्यानंतर 18,50,000 रोख रक्कम, दोन सोन्याची बिस्किटे, सुमारे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, सौदी अरेबियाचे चलन सापडले.
या धक्कादायक जप्तीनंतर तपासयंत्रणांना असा संशय आहे की शाहीनने भारतात परतल्यावर दहशतवादी निधी हाताळण्यासाठी आणि नेटवर्क वाढवण्यासाठी शिक्षणक्षेत्राचा मुखवटा वापरला. तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचाही तपास सुरू असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.