Rohit Pawar: वादग्रस्त विधानांनी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केल्याने महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, या ‘भोंदू’वर राज्यात कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नेमका वाद काय?
नागपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात, जिथे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारखे बडे नेते उपस्थित होते, तिथे बोलताना बागेश्वर बाबांनी इतिहासाचा विपर्यास केला. “शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती,” असा जावईशोध त्यांनी लावला. शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास नाकारणाऱ्या या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रोहित पवारांचा सरकारवर निशाणा
रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विट्मध्ये म्हटलं आहे की, “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते.”
हेही वाचा – Ambadas Danve : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार?; अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून… pic.twitter.com/fruZIuyZXH — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 25, 2026
दरम्यान, रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे की, “भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.”