Devendra Fadnavis: देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. इंधनाच्या बाबतीत विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे देशहिताचे लक्षण नाही, असे सांगत केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांना बळी पडून घाबरून जाऊ नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लॉजिस्टिक पार्कच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध विकासकामांचा आणि कर्जमाफीचा आढावा घेतला.
नागपूर ठरणार ‘ग्लोबल सप्लाय चेन’चे केंद्र
नागपूरच्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेण्यासाठी येथे लॉजिस्टिक पार्क आणि इंडस्ट्रियल पार्क उभारले जात आहेत. या सुविधांमुळे जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. “नागपूरला जे ‘लॉजिस्टिक ॲडव्हांटेज’ आहे, त्याचा उपयोग करून घेण्यासाठी या फॅसिलिटीची मोठी भूमिका असेल,” असेही त्यांनी नमूद केले.
विदर्भाचा कायापालट करणारा ‘वैनगंगा-नळगंगा’ प्रकल्प
विदर्भाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली असून कालच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली आहे. “हा राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असून यामुळे विदर्भातील सिंचनाचे चित्र पूर्णपणे बदलेल,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा प्रकल्प विदर्भाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून याबद्दल कोणाच्याही मनात संभ्रम नसावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण खुलासा, 30 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण
शेतकरी कर्जमाफीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “काही लोक बँकांबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही संस्थेकडून (राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा बँक किंवा सोसायटी) घेतलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत.” आमचा उद्देश बँकेला नव्हे, तर थेट शेतकऱ्याला फायदा मिळवून देण्याचा आहे. 30 जून पूर्वी ही कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होईल आणि ही कर्जमाफी जुन्या कोणत्याही योजनांपेक्षा अधिक प्रभावी असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.