Trump Christ Like Image : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर वादाचे वादळ निर्माण केले आहे. रविवारी रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत विचित्र फोटो शेअर केला, ज्यामध्ये ते स्वतः येशू ख्रिस्ताच्या रूपात दिसत आहेत. या चित्रात ट्रम्प यांच्या भोवती दैवी प्रकाश असून ते एका व्यक्तीवर उपचार करताना दिसत आहेत. या 'देवदूत' अवतारामुळे धार्मिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे चित्र शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप लिओ (Pope Leo XIV) यांच्यावर वैयक्तिक आणि बोचरी टीका करत नवा वाद ओढवून घेतला आहे.
पोप लिओ यांच्या कार्यपद्धतीवर ट्रम्प यांचे गंभीर आरोप
पोप लिओ हे गुन्हेगारी रोखण्यात अक्षम असून त्यांचे परराष्ट्र धोरण अत्यंत वाईट असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणच्या अणुमहत्त्वाकांक्षेबाबत पोप यांनी घेतलेली मवाळ भूमिका आणि अमेरिकेच्या लष्करी कारवायांना केलेला विरोध ट्रम्प यांना रुचलेला नाही. ट्रम्प म्हणाले की, 'मला असा पोप नको आहे, ज्याला इराणकडे अण्वस्त्रे असणे योग्य वाटते किंवा ज्याला अमेरिकेने व्हेनेझुएलातील ड्रग्ज माफियांवर कारवाई करणे चुकीचे वाटते.' त्यांनी पुढे असेही म्हटले की, पोप लिओ यांची निवड ही एक धक्कादायक घटना होती आणि जर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये नसते, तर लिओ व्हॅटिकनमध्ये पोहचलेच नसते.
कोविड काळातील चर्चवरील निर्बंधांवरून निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये कोविड-19 महामारीच्या काळातील आठवणी सांगितल्या. त्यावेळी प्रार्थना सभा घेतल्याबद्दल पाद्री आणि मंत्र्यांना झालेल्या अटकेबद्दल पोप लिओ गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'लोक एकमेकांपासून 10 ते 20 फूट लांब असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात होती, पण पोप यांनी त्या भीतीबद्दल कधीच भाष्य केले नाही,' अशी टीका ट्रम्प यांनी केली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्याऐवजी त्यांचा भाऊ लुईस याला पसंती दर्शवली आहे, कारण लुईस हे पूर्णपणे MAGA (Make America Great Again) विचारांचे समर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डाव्या विचारसरणीचे लाड थांबवण्याचा सल्ला
पोप लिओ यांनी राजकारण सोडून एक 'महान पोप' होण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या मते, पोप हे ओबामा समर्थकांना आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांना भेटत आहेत, ज्यामुळे कॅथोलिक चर्चचे मोठे नुकसान होत आहे. 'मी माझ्या कार्यकाळात गुन्हेगारी विक्रमी पातळीवर कमी केली आणि शेअर बाजारात (Stock Market) मोठी तेजी आणली, तरीही पोप माझ्यावर टीका करतात, हे चुकीचे आहे,' असे म्हणत त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली.