US, Israel, Iran War : मध्यपूर्वेतल्या युद्धातून अमेरिकेचा यू टर्न? इस्त्रायलच्या गोटात अस्वस्थता

अमेरिका आणि इराणमध्ये जर तडजोड झाली, तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर मोठे संकट उभे राहू शकते.

US, Israel, Iran War : मध्यपूर्वेतल्या युद्धातून अमेरिकेचा यू टर्न? इस्त्रायलच्या गोटात अस्वस्थता

US, Israel, Iran War : मध्यपूर्वेतील युद्धात आता एक अनपेक्षित वळण आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने युद्धविरामासाठी (Ceasefire) पावले उचलल्याचे वृत्त समोर येत आहे. एकीकडे इराणची लष्करी ताकद संपल्याचा आणि ते पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा ट्रम्प करत असतानाच, दुसरीकडे अमेरिकेनेच इराणला चर्चेचा प्रस्ताव धाडल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे अमेरिकेचे प्रचंड आर्थिक आणि लष्करी नुकसान होत असल्याने ट्रम्प प्रशासनाकडून हा गुप्त हालचालींचा मार्ग निवडला गेल्याचे बोलले जात आहे.

स्टीव्ह विटकॉफ यांचा इराणला चर्चेचा प्रस्ताव
एका खळबळजनक रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे स्वतः इराणसोबत युद्धविरामासाठी चर्चा करण्यास उत्सुक आहेत. गेल्या आठवड्यात विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांना एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये दोन्ही देशांनी वादावर तोडगा काढण्यासाठी समोरासमोर बसण्याची विनंती केली होती. मात्र, इराणने अद्याप यावर कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. अमेरिकेची ही सावध भूमिका इस्त्रायलसाठी धक्कादायक मानली जात आहे, कारण इस्त्रायल अजूनही इराणवर निर्णायक हल्ल्याच्या तयारीत आहे.

इराणचा चर्चेला नकार; सर्वोच्च नेत्यांचा मोठा निर्णय
अमेरिकेने चर्चेचा हात पुढे केला असला तरी, इराणच्या भूमिकेत लवचिकता दिसत नाहीये. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, आमच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशामुळे आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही संदेशाला उत्तर दिलेले नाही. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धविराम होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलचे मोठे नुकसान झाले असून, आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. अशा स्थितीत इराण स्वतःला वरचढ मानत असल्याने ते चर्चेसाठी तयार नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – Iran Political Crisis: युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये नवा ट्विस्ट! इस्लामिक सत्ता पडल्यास नेतृत्व स्वीकारायला तयार; 'या' नेत्याचे मोठे विधान

अमेरिकेची माघार की रणनीती?
डोनाल्ड ट्रम्प वारंवार असा दावा करत आहेत की इराण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे आणि त्यांचे नेते कोणत्याही क्षणी 'सिझफायर'साठी तयार होतील. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट होत आहे. या युद्धात अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च होत असून लष्करी तळांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीही होत आहे. अंतर्गत दबाव आणि आर्थिक तोटा टाळण्यासाठी ट्रम्प प्रशासन इराणसोबत पडद्यामागून हालचाली करत असल्याचे समजते. जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, तर इस्त्रायल एकाकी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इस्त्रायलचे भवितव्य काय?
अमेरिका आणि इराणमध्ये जर तडजोड झाली, तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर मोठे संकट उभे राहू शकते. इस्त्रायल हा अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र देश आहे, परंतु ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरण राबवून युद्धातून अंग काढून घेतल्यास इस्त्रायलला स्वतःच्या बळावर इराणचा सामना करावा लागेल. सध्या सुरू असलेल्या या संघर्षात इराणने आपली मिसाईल ताकद दाखवून दिली आहे. आता अमेरिकेच्या या नव्या भूमिकेनंतर मध्यपूर्वेतील युद्धाची दिशा पूर्णपणे बदलणार की हे महायुद्ध अधिक भडकणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Pakistan Afghanistan Conflict: 'आता चर्चा नाही, फक्त बदला'; काबुलवरील हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानला शेवटचा इशारा; युद्ध अटळ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number