NCP Banner Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सुंदोपसुंदी आता बॅनरबाजीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगडमध्ये आयोजित एका सत्कार समारंभात पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप होत असून, यामुळे पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांना “स्वतः देव बनण्याचा प्रयत्न करू नका,” असा कडक इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बॅनरवरून नेमकं काय घडलं?
रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाच्या मुख्य बॅनरवर केवळ तटकरे कुटुंबाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाची ओळख असलेल्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो या पोस्टरवरून पूर्णपणे गायब होते, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
“दैवतांना डावलू नका”; अमोल मिटकरी आक्रमक
या प्रकारावर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले की, “ज्यांच्या नेतृत्वावर सामान्य कार्यकर्त्यांचा जीव आहे, त्यांनाच डावलले जात असेल तर महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही.” मिटकरी यांनी सुनील तटकरेंना लक्ष्य करत पुढे म्हटले की, “पक्षाच्या दैवतांना बाजूला सारून स्वतःला मोठे समजण्याची चूक कुणीही करू नये. राजकारणात प्रोटोकॉल पाळला गेलाच पाहिजे.”
‘सुनेत्रा वहिनींशिवाय राष्ट्रवादी मान्य नाही’
पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. रायगडमधील त्या कार्यक्रमात या नेत्यांचे फोटो वगळणे ही अत्यंत दुर्दैवी आणि मनाला न पटणारी बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे ग्रासरूटवरील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा – Sanjay Shirsat: ‘अशोक खरातची अनेक प्रकरणं बाहेर पडतील, पण…’ संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा
“ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये.महाराष्ट्र हे सहन करणार नाही”.#प्रोटोकॉल pic.twitter.com/zrXuvOxvnu — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 29, 2026
राजकीय चर्चांना उधाण आणि अंतर्गत संघर्ष
रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात आधीच मोठे बदल आणि चर्चा सुरू आहेत. त्यातच आता रायगडमधील या बॅनर प्रकरणामुळे ‘तटकरे कुटुंब विरुद्ध पक्षातील इतर वरिष्ठ नेते’ असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत चाललेली ही ओढाताण राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरू शकते, अशी चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.