Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या शहराचा पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवणारच, हा आमचा शब्द आहे. तुम्ही फक्त येत्या 15 तारखेला मतदानाच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, मग पुढची 5 वर्षे तुमच्या सुखाची आणि विकासाची जबाबदारी आमची असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांना साद घातली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य रोड शो दरम्यान ते बोलत होते. इचलकरंजीत महायुतीचा ऐतिहासिक विजय होईल, असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, आजचा हा प्रतिसाद पाहून विजयाबद्दल कोणतीही शंका उरलेली नाही. ‘आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आणि भविष्यात जे करणार आहोत, त्यावर मते मागायला आलो आहोत. जलशुद्धीकरण प्रकल्प असो वा रस्ते, महायुती सरकारने इचलकरंजीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
विकासासाठी मोदींचा निधी आणि महायुतीची साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या प्रगतीसाठी मोठा निधी दिल्याचे सांगत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. गेल्या 70 वर्षांत शहरांकडे दुर्लक्ष झाले, पण आता निधी उपलब्ध आहे. मात्र, हा निधी योग्य पद्धतीने वापरण्यासाठी सक्षम लोक सत्तेत असणे गरजेचे आहे. मी स्वतः, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघेही इचलकरंजीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – Haribhau Rathod vs Rahul Narwekar : ‘मी काही लहान माणूस नाही…’; हरिभाऊ राठोड यांचा थेट नार्वेकरांना इशारा
मतदारांना कळकळीचे आवाहन
रोड शोमध्ये उसळलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री भारावून गेले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन केले की, ‘आज जो आशीर्वाद तुम्ही रॅलीत दिला आहे, त्याच्या दुप्पट निधी आम्ही शहराला देऊ. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, 15 जानेवारीला महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.’ इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, महायुतीने आपल्या या बड्या नेत्याच्या सभेने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.