Municipal Election 2026: ‘सांगली सर्वात चांगली’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते, त्याच सांगलीतून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत फडणवीस यांनी सांगलीकरांसाठी आश्वासनांची मोठी शिदोरी उघडली. यावेळी त्यांनी महायुती सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा केला.
सांगली आणि कोल्हापूरला वारंवार बसणाऱ्या महापुराच्या तडाख्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कायमस्वरूपी तोडगा जाहीर केला. ते म्हणाले की, या जिल्ह्यांची भौगोलिक रचना अशी आहे की येथे नेहमी महापूर येत राहणार, हे लक्षात घेऊन आम्ही पुराचे पाणी दुसरीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यामुळे सांगलीकरांची महापुरापासून कायमची सुटका होईल. विशेष म्हणजे, हे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवले जाणार असून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातही झाली आहे.
शहरी विकासावर भाष्य करताना फडणवीस यांनी सांगलीच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सांगली महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच महापालिकेसाठी भव्य आणि नवीन इमारत बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच, सांगलीसाठी स्वतंत्र विमानतळ उभारण्याची आणि शहरात IT इंडस्ट्री (माहिती तंत्रज्ञान क्षेत्र) आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. गावाचा विकास हा देशाचा विकास आहेच, पण वाढत्या गरजांनुसार शहरांचाही विकास होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – धक्कादायक! तिकीटासाठी शरीरसुखाची मागणी, ठाकरे गटाच्या माजी आमदारवर महिलेचा गंभीर आरोप
सांगलीतून प्रचाराची सुरुवात करण्यामागे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने झुकवण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या सभेद्वारे भाजपने आगामी महापालिका निवडणुकांसाठी आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीतील या सभेनंतर आता आगामी काळात मुंबई, पुणे, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा आणि भव्य रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे.