Devendra Fadnavis: विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचे दोन्ही घराणे एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आगामी 26 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली. हा मोर्चा राजकीय अजेंड्यापलीकडे असणार असून यामध्ये कोणत्याही पक्षाचे ध्वज न वापरता फक्त राष्ट्रध्वज तिरंगा हाती घेतला जाईल, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात पक्षाचे भेद विसरून सर्व विद्यार्थी, पालकांनी तसेच महाविकास आघाडीतील शरद पवारांपासून अगदी देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनीच सहभागी व्हावे, असे खुले आवाहन ठाकरेंनी केले.
शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा आणि संभाव्य चिथावणीवर आक्रमक भूमिका
पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरे यांनी प्रशासनाला थेट शब्दांत बजावले की, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याने हा प्रश्न केवळ स्थानिक प्रशासनापुरता उरलेला नसून थेट केंद्राच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने काढला जाईल आणि यामध्ये कोणतीही हुल्लडबाजी होणार नाही. परंतु, दिल्लीतील आंदोलनांप्रमाणे येथे जर काही समाजकंटकांना घुसवून वातावरण बिघडवण्याचा किंवा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा सडेतोड इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
? 2.18pm | 23-7-2026?Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/601PT5icNd — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2026
मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार: ‘माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातच सर्वात मोठा घोटाळा’
ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मोर्चाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षांवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले की, स्वतःच्या काळातील अपयश झाकून दुसऱ्यांवर बोट दाखवण्याची वृत्ती थांबवली पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा टीईटी (TET) परीक्षा घोटाळा हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घडला होता, ज्यामध्ये उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि नापास उमेदवारांना थेट पास केले गेले होते. उलट आमच्या सरकारने परीक्षा पार पडण्यापूर्वीच गैरप्रकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पारदर्शकता दाखवून दिली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी स्वतःचा भूतकाळ आधी तपासावा, असा टोला फडणवीसांनी लगावला.