Kiran Rijiju On Congress: लोकसभेत शुक्रवारी 131 वे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेस हा महिला-विरोधी पक्ष आहे. महिलांचे हक्क नाकारून ते आनंदोत्सव साजरा करत आहेत, हे पाहून मनाला दुःख होत आहे,” असे रिजिजू यांनी शनिवारी आयोजित परिषदेत सांगितले.
‘महिलांचे हक्क नाकारणे हे घोर पाप’
विरोधकांच्या जल्लोषावर निशाणा साधताना रिजिजू म्हणाले की, महिलांना आरक्षण आणि हक्क मिळवून देणारे विधेयक रोखणे हे एक घोर पाप आहे. “महिलांचे हक्क नाकारणे हा आपला विजय आहे, असे विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी आपला खरा चेहरा देशासमोर उघड केला आहे. महिलांना सन्मान मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे, मात्र विरोधकांनी त्यांच्या मानसिकतेतून या ऐतिहासिक संधीला विरोध केला,” असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसला महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
रिजिजू यांनी ठामपणे सांगितले की, या निकालामुळे भाजपला धक्का बसला नसून देशातील महिलांचे मोठे नुकसान झाले आहे. “महिला-विरोधी असल्याचा पुसता न येणारा कलंक आता काँग्रेस पक्षाला लागला आहे. या डागामुळे आगामी काळात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना देशातील महिलांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ऐतिहासिक संधी गमावली; पुढील विधेयकांवरून सरकारची माघार
विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा न देऊन एक मोठी ऐतिहासिक संधी गमावल्याचे रिजिजू यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी माहिती दिली की, ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, 2026’ आणि ‘सीमांकन विधेयक, 2026’ ही दोन विधेयके देखील प्रलंबित आहेत. ही विधेयके 131 व्या घटनादुरुस्तीशी निगडित असल्याने, आता सरकार या उर्वरित दोन विधेयकांवर कोणतीही कार्यवाही करणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या हक्कांची मोहीम सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.