David Warner Arrested: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 चा हंगाम रंगात आलेला असतानाच, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका मोठ्या कायदेशीर वादात सापडला आहे. सिडनीमध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वॉर्नरला अटक केली होती. काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली असली, तरी या प्रकरणामुळे वॉर्नरच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सध्या 'कराची किंग्ज'चे कर्णधारपद भूषवणारा वॉर्नर सुट्टीसाठी आपल्या गावी गेला असताना ही घटना घडली.
ब्रेथ टेस्टमध्ये आढळले दुप्पट अल्कोहोल
मिळालेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलच्या रात्री सिडनीच्या मारुब्रा (Maroubra) भागात पोलिसांनी ही कारवाई केली. 'News.com.au' च्या वृत्तानुसार, पोलिसांनी केलेल्या श्वास तपासणीत (Breath Test) वॉर्नरच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचे आढळून आले. तपासणी पथकाला पाहताच वॉर्नरने आपली गाडी बाजूला उभी केली होती, मात्र पोलिसांनी त्याची जागेवरच तपासणी केली असता निकाल 'पॉझिटिव्ह' आला. त्यानंतर त्याला तातडीने मारुब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस ठाण्यातील दुसऱ्या तपासणीत गुन्हा सिद्ध
न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या दुसऱ्या तपासणीत वॉर्नरच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण 0.104 इतके नोंदवले गेले. "5 एप्रिल रोजी संध्याकाळी साधारण 5:30 वाजता मलाबार रोडवर ही कारवाई करण्यात आली. संबंधित चालकाला 7 मे 2026 रोजी 'डाऊनिंग सेंटर लोकल कोर्ट'मध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे वॉर्नरला आता न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा – IPL 2026: IPL मध्ये 2400 कोटींचा तोटा? ललित मोदींचा मोठा दावा; धक्कादायक कारण समोर, BCCI चं नियोजन…
कारकिर्दीवर होणार परिणाम?
डेव्हिड वॉर्नरने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या तो जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळत आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 100 हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या या खेळाडूच्या नावे अनेक विक्रम आहेत. मात्र, या ताज्या प्रकरणामुळे पीएसएलमधील त्याच्या सहभागावर आणि कराची किंग्जच्या कर्णधारपदावर काय परिणाम होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीनंतरच या प्रकरणाचा अंतिम निकाल स्पष्ट होईल.